पुणे : कर्णकर्कश हाॅर्न वापरण्यावर बंदी आहे. अशा प्रकारचे हाॅर्न वापरणाऱ्या वाहन चालक, तसेच फटाक्यासारखा आवाज निर्माण करणारे हाॅर्नवर बंदी असताना शहरात सर्रास अशा प्रकारचे हाॅर्न वाहनचालक वापरत असल्याचे दिसून आले आहे. नगर रस्त्यावरील विमाननगर भागात डंपर चालकाने कर्णकर्कश हाॅर्न वाजविल्याने दुचाकीस्वार तरुणाचे नियंत्रण सुटले आणि तो रस्त्यात पडला. भरधाव डंपरच्या चाकाखाली सापडून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी मध्यरात्री घडली.

सचिन वसंत धुमाळ (वय २८, रा. मल्हार नगर, वडगाव शेरी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत स्वप्नील भानुदास माने (वय २५, रा. बालाजी पीजी, सोमनाथनगर,वडगाव शेरी, मूळ रा. रावरगांव, ता. सेलू, जि. परभणी) याने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या अपघातानंतर पसार झालेल्या डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास भरधाव डंपर नगर रस्त्यावरुन निघाला होता. दुचाकीस्वार सचिन धुमाळ आणि स्वप्नील माने हे विमाननगरमधील टाटा गार्डन चौकातून निघाले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या डंपर चालकाने जोरात हाॅर्न वाजविला.

कर्णकर्कश हाॅर्नच्या आवाजामुळे दुचाकीस्वार सचिन घाबरला आणि त्याचे नियंत्रण सुटले. दुचाकी घसरल्यानंतर सचिन आणि त्याचा मित्र स्वप्नील हे रस्त्यात पडले. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या डंपरच्या चाकाखाली सापडून सचिनचा मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता डंपर चालक पसार झाला. पसार झालेल्या डंपर चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलिसंनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे तपास करत आहेत.

पोलिसांची मोहीम थंडावली

कर्णकर्कश हाॅर्न वापरणारे वाहन चालक, तसेच फटाक्यांसारखा आवाज निघणारे हाॅर्न वापरणाऱ्या बुलेटस्वारांविरुद्ध वाहतूक पोलिसांसह शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील पथकांनी कारवाईचा बडगा उगारला होता. अशा प्रकारचे हाॅर्न वापरणाऱ्या चालकांविरुद्ध खटले दाखल करून पोलिसांनी हाॅर्न जप्त केले होते. जप्त केलेल्या हाॅर्नवर पोलिसांनी बुलडोझर चालवून ते नष्ट केले होते.

सोलापूर रस्त्यावर ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

पुणे-सोलापूर रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. शिवाजी भानुदास वैरागे (वय ६२, रा. माळीमळा, लोणी काळभोर) असे मृत्यमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वैरागे यांचा मुलगा विजय (वय ३९) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी वैरागे हे २ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्याने निघाले होते. लोणी काळभोर परिसरातील माळी मळा भागात भरधाव वाहनाने वैरागे यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या वैरागे यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद जगताप तपास करत आहेत.