संजय जाधव, लोकसत्ता

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून चिंचवड, देहूरोड आणि उरुळी या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम वेगाने सुरू आहे. चिंचवड स्थानकासाठी २०.४० कोटी रुपये, देहूरोड स्थानकासाठी ८.०५ आणि उरुळी स्थानकासाठी १२.८७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अमृत भारत रेल्वे योजनेंतर्गत हे काम करण्यात येत आहे.

अमृत भारत रेल्वे योजनेंतर्गत पुणे विभागातील १६ स्थानकांचा विकास केला जात आहे. प्रत्येक स्थानकाचा विकास करताना तेथील दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे. त्याबरोबरच स्थानकाची सध्याची रचनाही विचारात घेतली गेली आहे. दूरदृष्टीने स्थानकांचा विकास करण्यावर भर दिला जात आहे. प्रामुख्याने प्रवासीकेंद्रित सुविधा स्थानकांवर विकसित केल्या जात आहेत. स्थानकाच्या बाह्य रूपासोबत अंतर्गत भागातही सुधारणा करण्यात येत आहेत.

आणखी वाचा-मनसेचे पुण्याकडे अधिक लक्ष, लोकसभा लढण्याची तयारी सुरू

चिंचवड स्थानकातील फलाटांवर आच्छादन बसविण्याचे प्रगतिपथावर आहे. याचबरोबर स्वच्छतागृहे बांधण्यासाठी पायाभरणीचे कामही सुरू आहे. देहूरोड स्थानकावरही फलाटांवर आच्छादन बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे. उरुळी स्थानकाच्या पुनर्विकासाचे कामही वेगाने सुरू आहे. स्थानकात खोदकाम करून पायाभरणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. याचबरोबर स्वच्छतागृह उभारणीचे काम सुरू आहे. स्थानकाभोवतीच्या परिसराचे काम केले जाणार आहे. याचबरोबर प्रवेशद्वाराचीही उभारणी केली जाईल. स्थानकात नवीन वाहनतळ केला जाणार आहे. तसेच, फलाटांवर आच्छादनही बसविले जाणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

आणखी वाचा-नद्यांच्या संवर्धनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पुढाकार… नदी सुरक्षा दल नेमणार

कोल्हापूर स्थानकाचे रूप पालटणार

कोल्हापूर स्थानकाच्या पुनर्विकासाठी ४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. स्थानकात जुने बांधकाम पाडण्यात आले आहे. तिथे खोदकाम करून पायाभरणीचे काम सुरू आहे. स्थानकाला नवीन दोन प्रवेशद्वार असणार आहेत. याचबरोबर स्थानकात दोन लिफ्ट आणि दोन एस्केलेटर बसविण्यात येणार आहेत. स्थानकातील सर्व फलाटांवर आच्छादन बसविण्यात येणार आहे. स्थानकावर प्रवाशांसाठी प्रतीक्षालयाची उभारणीही केली जाणार आहे.