पुणे : अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत देशातील १०३ स्थानकांचा कायापालट करण्यात आला असून, मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून साताऱ्याच्या सीमेवर असलेल्या लोणंद आणि बारामती तालुक्यातील केडगाव या दोन स्थानकांचा यामध्ये समावेश आहे. ही स्थानके आधुनिक सुविधांनी पूर्णपणे सज्ज झाली असून, येत्या गुरुवारी (२२ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १०३ स्थानकांचे दृक्श्राव्य माध्यमातून उद्घाटन होणार आहे.

दक्षिण भारत आणि पश्चिम महाराष्ट्रातून लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्याच्या थांब्याबाबत नियोजन करण्यात येणार असल्याने प्रवाशांचा प्रवास आणखी सुलभ होणार आहे.मध्य रेल्वे पुणे विभागात अमृत भारत स्थानक योजनेतून २० रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात येत आहे. त्यांपैकी लोणंद आणि केडगाव या दोन स्थानकांमध्ये वातानुकूलित प्रतीक्षाकक्ष, रंगरंगोटी केलेल्या भिंती, रेल्वेची माहिती दर्शविणारे इलेक्ट्रिक फलक, आसन सुविधा, तिकीट घर, रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, प्रकाश व्यवस्था, वाहनतळ व्यवस्था, उपाहारगृह, काँक्रीटचे रस्ते, दिव्यांगांसाठी पदपथ, पिण्याच्या पाण्यासाठी सुविधा, आपत्कालीन व्यवस्था, ध्वनिक्षेपक यंत्रणेची व्यवस्था करण्यात आली असल्याचे पुणे रेल्वे विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक हेमंतकुमार बेहरा यांनी सांगितले.

लोणंद स्थानकासाठी दहा कोटी खर्चलोणंद रेल्वे स्थानकावर दिवसभरातून १६ रेल्वे गाड्यांची वाहतूक होते. कोल्हापूर-पुणे ही वंदे भारत एक्स्प्रेस या मार्गावरून धावते. प्रति दिवस सुमारे ७०० ते ८०० प्रवासी प्रवास करतात. या स्थानकावर दोन रेल्वे मार्गिका असून, कोल्हापूर, गोवा, बंगळुरू आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. कोयना, सह्याद्री आणि महाराष्ट्र एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्या या स्थानकावर थांबतात. या स्थानक परिसराचा पुनर्विकास करण्यात आला असून, त्यासाठी १० कोटी ४८ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.

केडगाव स्थानकाचा पुनर्विकास

केडगाव रेल्वे स्थानकावर चार रेल्वे मार्गिका आहेत. दिवसभरात २७ रेल्वे थांबतात. यामध्ये लांब पल्ल्याच्या पाच रेल्वे, डेमू यांचा समावेश असून, प्रतिदिवस २ हजार ८०० प्रवासी प्रवास करतात. अमरावती-पुणे, मुंबई सुपरफास्ट, सातारा-दादर, हैदराबाद-मुंबई सुपरफास्ट, हरंगुळ एक्स्प्रेस, नांदेड – पुणे या महत्त्वाच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. शिर्डी, सोलापूर, मुंबई आणि दक्षिणेतील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. १२ कोटी ५५ लाख रुपये खर्च करून या स्थानक परिसराचा पुनर्विकास करण्यात आला आहे.

कोटअत्याधुनिक सुविधांमुळे स्थानकाचा कायापालट करण्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्यात आणखी दोन रेल्वे मार्गिका वाढविण्याचे नियोजन आहे. त्याचा प्रवाशांना फायदा होईल. नक्कीच आणखी प्रवासी गर्दी वाढेल. – एच. आर. रामटेक, स्थानक व्यवस्थापक, लोणंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोटअमृत भारत स्थानक योजनेंतर्गत स्थानकावरील प्लॅटफॉर्मनुसार दिव्यांगांसाठी स्वतंत्र पदपथ, अतिरिक्त स्वच्छतागृह, वातानुकूलित आणि सामान्य असे प्रतीक्षा कक्ष, तीन भाषांत माहिती दर्शविणारे इलेक्ट्रिक फलक आदी सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. – मुकेशकुमार सिंग, स्थानक व्यवस्थापक, केडगाव