पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि इतर सवलतपात्र प्रवाशांना देण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट कार्ड’ यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना तात्पुरते कागदी पास देण्यात येत असून, अनेक ज्येष्ठ प्रवाशांकडे पास नसल्याने त्यांना प्रवासामध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे.

राज्य सरकारकडून एसटी महामंडळाच्या वातानुकूलित, शयनयानासह इतर बसमध्ये ६५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, ७५ वर्षापुढील नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांसाठी ५० टक्के सवलत, अपंग तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठीदेखील सवलतीत प्रवास योजना राबविण्यात येत आहे. लाभार्थ्यांना ‘स्मार्ट कार्ड’ बाळगणे बंधनकारक आहे. अनेकांनी नव्याने ‘स्मार्ट कार्ड’ काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. मात्र, अद्याप त्यांना ‘स्मार्ट कार्ड’ मिळालेले नाही. बसमध्ये अनेकांना कागदी पास दिल्याने ते सांभाळणे कठीण होत आहे. याबाबत स्थानिक एसटी महामंडळाच्या कार्यालयातून स्मार्ट कार्ड आले नसल्याचे प्रवाशांना सांगितले जाते किंवा अनेकदा कार्यालयच बंद ठेवल्याचा अनुभव काही प्रवाशांना आला. स्मार्ट कार्ड नसल्याने प्रवाशांना ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, मतदानकार्ड किंवा इतर कागदपत्र सोबत बाळगावी लागतात. पुरावा दाखविल्यानंतर ‘स्मार्ट कार्ड’ किंवा तात्पुरत्या कागदी पासबाबत वाहकाकडून विचारणा केली जाते. कार्ड नसल्याने प्रवास करताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी आगार प्रमुखांकडे करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>>पुणे: पुढील २० वर्षांच्या प्रदूषणाचे नियोजन करा, प्रदूषण महामंडळाच्या सूचना !

ज्येष्ठ नागरिक असल्याने पुण्यावरून अक्कलकोटसाठी जात असताना बसमध्ये स्मार्ट कार्ड दाखविण्याबाबत विचारणा केली. स्मार्ट कार्ड नसल्याने कागदी पास किंवा इतर ओळखपत्र दाखविण्यासाठी आग्रह धरला. माघारी परत येईपर्यंत वाहकांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जावे लागले. – किसन हासे, प्रवासी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्मार्ट कार्ड तयार करणाऱ्या ज्या कंपनीला काम दिले आहे, त्या कंपनीमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे ऑनलाईन सर्व्हरच्या समस्या निर्माण होत आहे. माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) विभागाकडून याबाबत दुरुस्तीचे काम सुरू आहे. लवकरच ही सेवा पूर्ववत करण्यात येईल.- प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, पुणे</strong>