गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी उंचच उंच देखावे उभारण्याची हौस विसर्जन मार्गावर असलेल्या वृक्षांच्या मुळावर येत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. मिरवणुकीला ‘अडथळा’ ठरू नये म्हणून शहरातील मिरवणूक मार्गावरील वृक्षांच्या फांद्या छाटण्याचे काम सध्या महापालिकेकडून वेगात सुरू आहे. या छाटणीत आतापर्यंत ५०० ट्रक्सपेक्षा जास्त लाकूड जमा झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महापालिकेतर्फे नियमितपणे वृक्षांची छाटणी केली जाते. त्यात रस्त्यांवर येऊन वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या फांद्यांचा समावेश असतो. मात्र, गणेशोत्सवात ही छाटणी मोठय़ा प्रमाणात वाढते. त्याला कारण ठरते, गणपती मंडळांचे उंच मांडव आणि विसर्जन मिरवणुकीसाठी केले जाणारे उंचच उंच देखावे. त्यामुळे सध्या महापालिकेकडून झाडांची छाटणी करण्याचे काम वेगात सुरू आहे. त्यासाठी पालिकेकडे असलेल्या चारपैकी तीन शिडय़ा वापरल्या जात आहेत. एक शिडी नादुरुस्त आहे, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. सध्या वेगवेगळ्या पथकांकडून हे काम सुरू आहे. त्यात आतापर्यंत तब्बल ५०० ट्रक भरतील, यापेक्षाही जास्त फांद्या तोडण्यात आल्या आहेत. याबाबत वृक्ष अभ्यासकांनी सांगितले की, एक वृक्ष तोडला की सामान्यत: एक ट्रक भरेल इतके लाकूड मिळते. याचा अर्थ आतापर्यंत पाचशे झाडे तोडण्यात आली आहेत. हे काम अजूनही सुरू असून, ते विसर्जन मिरवणुकीपर्यंत सुरू राहणार आहे, असे महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘अशी छाटणी तर दरवर्षी होते’
‘‘मिरवणूक मार्गावरील झाडांची छाटणी दरवर्षी होते. एरवी रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून वृक्षांच्या फांद्या छाटल्या जातात. गणपतीच्या काळात मिरवणूक मार्गावरील वृक्षांच्या फांद्या छाटण्यात येतात. आता तीन शिडय़ा वापरून हे काम सुरू आहे. ते आणखी काही दिवस चालू राहील. नेमके किती वृक्ष तोडण्यात आले याची आकडेवारी आमच्याकडे नाही.’’
– मोहन ढेरे (पुणे महापालिकेचे वृक्ष अधिकारी)
नेमके किती वृक्ष छाटले?
अनधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त ट्रक भरतील इतके वृक्ष छाटण्यात आले आहेत. मात्र, याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे माहिती नसल्याचे सांगण्यात आले. महापालिकेचे वृक्ष अधिकारी मोहन ढेरे आणि सहायक उद्यान अधीक्षक संतोष कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता अशी माहिती आपल्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे किती मार्गावरील किती वृक्ष छाटण्यात आले, याचा अधिकृत आकडा समजू शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tree cutting for ganpati immersion
First published on: 05-09-2014 at 02:50 IST