पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अल्पवयीन आरोपीचा बंगला, अपघातस्थळ, पब, तसेच कल्याणीनगर भागातील १५० हून जास्त ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणातून अनेक गोष्टी उघडकीस येणार असल्याने तपासाला गती मिळणार असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे, सतीश गोवेकर आणि गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांकडून तपास करण्यात येत आहे. आतापर्यत पोलिसांनी वडगाव शेरीतील अगरवाल कुटुंबीयांचा बंगला, अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केलेला पब, अपघाताचे ठिकाण, मुंढवा, कोरेगाव पार्क, वडगाव शेरीसह वेगवेगळ्या भागातील १५० हून जास्त ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : पुणे कार अपघात प्रकरणी : युवक काँग्रेसकडून निबंध स्पर्धेच आयोजन, तरुणांनी शब्दातून व्यक्त केला रोष

गुन्हे शाखेने शनिवारी (२५ मे) बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या वडगाव शेरीतील बंगल्यात छापा टाकला होता. बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणात तांत्रिक छेडछाड केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुलगा आणि चालक बंगल्यातून मोटार घेऊन बाहेर पडल्याचे दिसून आले आहे.

कल्याणीनगर भागात गेल्या रविवारी (१९ मे) भरधाव मोटारीने संगणक अभियंता अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना धडक दिली. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या विशाल अगरवालच्या मुलाला बाल न्याय मंडळाने सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून आजोबा सुरेंद्र यांना मोटारचालकाला धमकाविल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : विद्यापीठात सापडले अंमली पदार्थ… कारवाई का नाही? युवा सेनेचा सवाल

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

अपघातानंतर अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मोटार अल्पवयीन मुलगा चालवित नव्हता. चालकाने अपघात केल्याचा बनाव अगरवाल यांनी रचला होता. अुपघातानंतर मोटारचालक गंगाधर हेरीक्रुबला आजोबा सुरेंद्र यांनी वडगाव शेरीतील बंगल्यावर बोलावून घेतले. पैसे देण्याचे आमिष दाखवून अपघात तुझ्याकडून झाला, असे पोलिसांना सांग, असा दबाव अगरवाल यांनी मोटारचालकावर टाकला. त्याला दोन दिवस बंगल्यावर डांबून ठेवले होते. मोटारचालक बेपत्ता झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय बंगल्यात गेले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर मोटारचालकाला सोडून देण्यात आले. मोटारचालकाला डांबून ठेवणे, त्याला धमकाविल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल आणि आजोबा सुरेंद्र यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.