पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात आठ दिवसांपूर्वी कार अपघातामध्ये तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर या प्रकरणातील आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि चालकाला धमकावल्या प्रकरणी आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्यासह अन्य चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्या प्रकरणी सर्वांची चौकशी सुरू आहे.पण या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी मुलास अपघाताच्या काही तासात जामीन मिळाला.

३०० शब्दाचा निबंध लिहिणे,१५ दिवस येरवडा भागात वाहतुक नियमन करणे. व्यसनमुक्ती करीता समुपदेशन घेणे या अटीच्या आधारे अल्पवयीन मुलास जामीन देण्यात आला होता. त्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यावर, पुणे पोलिसांनी न्यायालयात पुन्हा अर्ज केल्यावर त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.या सर्व घडामोडी दरम्यान पुणे शहर युवक काँग्रेसकडून अपघाताच्या ठिकाणी निबंध स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा…विद्यापीठात सापडले अंमली पदार्थ… कारवाई का नाही? युवा सेनेचा सवाल

या स्पर्धेला शहरातील विविध भागातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.तर आमदार रविंद्र धंगेकर यांनी निबंध स्पर्धेतील सहभागी तरुणांशी संवाद देखील साधला.माझी आवडती कार ( पॉर्शे , फरारी ,मर्सिडीज) दारूचे दुष्परिणाम,माझा बाप बिल्डर असता तर ? मी खरच पोलीस अधिकारी झालो तर ? अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण ? असे विषय या निबंध स्पर्धेत होते.तर ११ हजार १११ रुपयाच पहिल बक्षीस ,१० हजार द्वितीय बक्षीस आणि ५ हजार तृतीय बक्षीस असे बक्षिस देखील जाहीर करण्यात आले आहे.या निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या तरुणांनी स्थानिक प्रशासनापासून ते केंद्रातील सत्ताधारी पक्षाबाबत आपला रोष व्यक्त केला.

यावेळी आमदार आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले की, कल्याणी नगर भागात आठ दिवसापूर्वी अपघाताची घटना घडली.ती अंत्यत दुर्दैवाची असून या प्रकरणातील सर्व आरोपींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आहे.तसेच पुणे शहरात देशातील अनेक भागातून तरुण आणि तरुणाई शिक्षणासाठी येतात आणि ते पब मध्ये जातात.यामुळे शहरातील पब संस्कृतीला आळा घातला पाहिजे.हे काम राज्य उत्पादन शुल्क आणि पुणे पोलिसाच काम आहे.मात्र हे काम करताना कोणताही विभाग दिसत नाही.या अपघाताच्या घटनेनंतर कारवाईला सुरुवात केली आहे.पण अगोदरच कारवाई केली असती.तर हे निष्पाप तरुण आणि तरुणी वाचले असते,अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा…Pune Porsched Accident : “अपघाताची…”, अल्पवयीन मुलाच्या आईने चालकाकडे केली होती विनंती

तसेच ते पुढे म्हणाले की,त्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. त्याला तरुणांनी चांगला प्रतिसाद देत,त्यांच्या भावनांना निबंधमधून व्यक्त केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.