पिंपरी : पावसामुळे शहरात झाडपडीच्या घटना घडल्या असून, त्यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. दापोडीतील लिंभोरे वस्ती येथे रविवारी रात्री एका घरावर पिंपळाचे झाड पडल्याने घरातील तीन जण जखमी झाले. आकुर्डी येथे सोमवारी दुपारी झाड कोसळल्याने दुचाकीवर गप्पा मारत बसलेले दोन तरुण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दापोडीतील दुर्घटनेत श्रद्धा सुनील समुद्रे (वय १२), पारू सुनील समुद्रे (वय ३५) आणि सुनील समुद्रे (वय ४०) हे जखमी झाले. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दापोडीतील लिंभोरे वस्ती येथे समुद्रे कुटुंबासह तीन कुटुंबे सिमेंटच्या पत्र्याच्या घरात राहतात. समुद्रे यांच्या घराच्या मागे पिंपळाचे झाड आहे. रविवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास पिंपळाचे झाड अचानक कोसळून समुद्रे यांच्या घरावर पडले. या दुर्घटनेत समुद्रे यांच्या घराचे पत्रे तुटून झाडाच्या फांद्या घरात आल्या. यात घरातील समुद्रे दाम्पत्यासह त्यांची मुलगी श्रद्धा हे तिघे जखमी झाले. स्थानिक रहिवाशांनी तिघा जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

आकुर्डी येथील दुर्घटनेत अमन खान (वय २२, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) आणि साहिल खान (वय २४, रा. पंचतारानगर, आकुर्डी) हे जखमी झाले. आकुर्डी भाजी मंडईजवळ कुजलेले झाड होते. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास या झाडाखाली अमन आणि साहिल हे दोघे एका दुचाकीवर बसून गप्पा मारत होते. यावेळी झाड उन्मळून कोसळले. त्यामध्ये दोघेही जखमी झाले. नागरिकांनी फांद्या बाजूला करीत दोघांची सुटका केली.दरम्यान, झाड रस्त्यात पडल्याने आकुर्डी येथील वाहतुकीचा खोळंबा झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडाच्या फांद्या कापून झाड रस्त्याच्या बाजूला केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.