शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ६० ठिकाणी झाडे पडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने झाडांच्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केली.

शहरात शुक्रवारी (३० सप्टेंबर) दुपारी चारनंतर मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात झाडे कोसळली. डेक्कन जिमखाना भागातील बीएमसीसी रस्ता, शिरोळे रस्ता, शिवाजीनगर न्यायालयाचे आवार तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर झाडे पडण्याच्या घटना घडल्या. विधी महाविद्यालय रस्ता, वाकडेवाडी, सहकारनगर, धनकवडी, कात्रज, बिबवेवाडी, मुंढवा, कोंढवा, हडपसर, मांजरी, येरवडा, लोहगाव, पद्मावती, पाषाण, बाणेर, ओैंध, बालेवाडी, सिंहगड रस्त्यासह साठ ठिकाणी झाडे पडल्याची माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली.

शहरातील वेगवेगळ्या भागात झाडे पडल्याच्या घटनांची माहिती नागरिकांनी दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. शहरात दुपारी झालेल्या पावसामुळे वेगवेगळ्या भागात झाडे कोसळण्याच्या घटनांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ उडाली. झाडे पडण्याच्या घटनांमुळे वाहतूक विस्कळीत झाली. झाडांच्या फांद्या हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.