सन २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा पतंप्रधान झाल्यापासून मोदी जॅकेटचा देशात ट्रेन्ड आला असून देशातील विविध निवडणुकांमध्ये या जॅकेटची जादू पाहायला मिळाली. आता महाराष्ट्रात होणार्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाजारात जॅकेटसाठी चक्क मोदींचा फोटो असलेले कापड दाखल झाले आहे. यामध्ये केवळ मोदीच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकर, काँग्रेसचे निवडणूक चिन्ह ‘हाताचा पंजा’ यांचे फोटो असणारे कापडही विक्रीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये मोदींचा फोटो असलेल्या कापडाला सर्वाधिक मागणी असल्याचे विक्रेते सांगतात.
निवडणुकीच्या काळात प्रत्येक राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, रॅली काढण्यात येतात. त्यासाठी झेंडे, चिन्ह, उपरणी यांसारख्या प्रचार साहित्यांची त्यांना गरज भासते. दरम्यान, आपला प्रचार अधिकाधिक मतदारापर्यंत पोहचण्यासाठी तसेच मतदारांना आकर्षित करण्यासाठी या पक्षांकडून विविध युक्त्या योजल्या जातात. त्यानुसार, उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते यंदा असे प्रचार साहित्या खरेदी करताना दिसत आहेत. या प्रचार साहित्यांबरोबरच यंदा निवडणुकीनिमित्त डॉ. आंबेडकर, पंतप्रधान मोदी, काँग्रेस पक्षाचे चिन्ह यांचा फोटो असलेले कापड बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहे.
कापड विक्रेते राजेश खिंवसरा सांगतात, “मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्षाच्या चिन्हांच्या साड्या बाजारात विक्रीसाठी आल्या होत्या. त्या साड्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी होती. तर, यंदा मागील निवडणूकीपेक्षा वेगळा ट्रेन्ड आहे. त्यानुसार, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जॅकेटसाठी लागणारे कापड विक्रीसाठी आले आहे. या कापडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस पक्षाचे चिन्ह ‘हाताचा पंजा’ यांचे फोटो आहेत. यातील प्रत्येक कपड्याला राजकीय क्षेत्रातील लोकांकडून चांगली मागणी आहे. इतरही पक्षांची चिन्हं असलेले कापडही लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.”