मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेला देखणा नायक हे अरुण सरनाईक यांचे वैशिष्ट्य. चित्रपटसृष्टीमध्ये त्यांची कारकीर्द बहरात असतानाच एका अपघातामध्ये अरुण सरनाईक, त्यांची पत्नी आणि मुलाचे दुर्दैवी निधन झाले. त्या वेळी शिक्षणासाठी परगावी वसतिगृहामध्ये वास्तव्यास असलेली अवघ्या वीस वर्षांची, सविता ही त्यांची मुलगी, त्यांच्या घरातील एकमेव व्यक्ती हा आघात झेलत होती. या घटनेला ४० वर्षे उलटली. आयुष्य पुढे जात असताना पित्याच्या स्मृतींना तब्बल चार दशकांनी या लेकीने सर्जनशील रूप दिले. अरुण सरनाईक यांच्यावर चित्रित झालेल्या ‘पप्पा सांगा कुणाचे…’ या लोकप्रिय गीताचा आधार घेऊन सविता सरनाईक-नाईकनवरे यांनी माहितीपटाची निर्मिती केली.
सविता सरनाईक-नाईकनवरे यांची निर्मिती असलेल्या या माहितीपटाचे दिग्दर्शन डाॅ. संतोष पाठारे यांनी केले आहे. माहितीपटाची संकल्पना विशाखा तुंगारे-देशपांडे यांची आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (२ ऑगस्ट) बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी साडेदहा वाजता ‘पप्पा सांगा कुणाचे…’ या लघुपटाचा पुण्यातील प्रीमिअर खेळ होणार आहे. अरुण सरनाईक यांच्या चित्रपटांनी भारावलेल्या पिढीचे प्रतिनिधी या नात्याने ज्येष्ठ दिग्दर्शक डाॅ. जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते व मानसोपचारतज्ज्ञ डाॅ. मोहन आगाशे आणि नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर या वेळी उपस्थित राहणार आहेत.
‘मी मिरजेमध्ये वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होते. मैत्रिणींसमवेत दुपारचे भोजन घेतले, तेव्हाच अचानक मला एक दूरध्वनी आला. अरुण सरनाईक यांच्या गाडीचा अपघात झाला असून, तातडीने घरी कोल्हापूरला येण्यासंदर्भात मला सांगण्यात आले. घरासमोर असलेली प्रचंड गर्दी, अरुण सरनाईक यांचे पार्थिव पाहतानाच या अपघातामध्ये आई आणि भावाचाही मृत्यू झाल्याचे समजले. एका अपघातामध्ये मी कुटुंब गमावले होते. पण, मी रडले नाही. डोळ्यांतून अश्रू ओघळले नाहीत. धक्का बसल्यामुळे मी रडत नाही, हे पाहून काहींनी मी रडावे यासाठी प्रयत्न केले. पण, न डगमगता जबाबदारी स्वीकारायची, हा संस्कार आईने केला होता. त्यामुळे आमच्या कुटुंबासमवेत राहणारी माझी मावशी रत्नमाला पार्टे ही माझी जबाबदारी आहे, हा विचार त्या क्षणी माझ्या मनामध्ये आला,’ अशा शब्दांत सविता यांनी त्या घटनाक्रमाला उजाळा दिला.
त्या वेळी सविता यांनी दु:खाला आवर घातला असला, तरी आता त्यांच्या डोळ्यांनी सर्जनशील काम केले आहे. सुरक्षित वातावरणात लहानाची मोठी होत असलेली आणि डाॅक्टर होऊन वैद्यकीय सेवा करण्याचे स्वप्न पाहणारी कोल्हापूर येथील मुलगी ते कुटुंबातील सदस्यांना दूर नेणाऱ्या दुर्दैवी अपघातानंतर परिवर्तन झालेली जबाबदार महिला अशी वाटचाल करणाऱ्या सविता यांनी या माहितीपटातून अरुण सरनाईक यांचे व्यक्तिगत जीवन आणि व्यावसायिक कारकीर्द उलगडली आहे.
‘हा अपघात घडला तेव्हा अरुण सरनाईक ४९ वर्षांचे होते. आई ४६ वर्षांची, तर मोठा भाऊ संजय अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. त्या काळात वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी मला दु:खातून बाहेर येण्यास मदत केली. त्यांच्या प्राेत्साहनामुळे मी शिक्षण पूर्ण करू शकले. तर, मुलीने स्वतंत्र असावे असे संस्कार घडविणारी आई उत्तम वाचक होती. ॲथलिट, बॅडमिंटनपटू आणि इंग्रजी चित्रपटांची चाहती असेही तिच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू होते. तिच्या खिलाडी वृत्तीतून माझ्यामध्ये आत्मविश्वास आणि धैर्य आले. पदवी संपादन केल्यानंतर बांधकाम व्यावसायिक रणजित नाईकनवरे यांच्याशी विवाह झाला. एक मुलगा आणि मुलगी अशा संसारामध्ये मी सुखी आहे’, असे सविता यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, ‘अरुण सरनाईक यांच्यावर माहितीपटाची निर्मिती करण्यासाठी मी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भरत नाट्य संशोधन मंदिर जाऊन त्यांच्याविषयी माहिती घेतली. त्यासाठी बरेच संशोधनात्मक काम केले. त्यांच्यासमवेत काम केलेले अभिनेते, पार्श्वगायक आणि त्यांच्याशी परिचय असलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखतींमुळे हा माहितीपट परिपूर्ण होईल, हा कटाक्ष ठेवला. या कालखंडात पती रणजित नाईकनवरे यांनी सर्वतोपरी सहकार्य केल्याने हा माहितीपट साकारणे शक्य झाले. वडिलांना स्नेहांजली अर्पण करण्याचा हा मार्ग मला आनंद देऊन गेला…’