मी पेशाने मूळचा शिक्षक. रमणबाग शाळेत गणित, विज्ञान विषय शिकवायचो. सन १९६२ मध्ये रामभाऊ म्हाळगी, गोविंदराव मालशे यांच्या संपर्कात आलो. तेव्हापासून आजतागायत कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. माझ्या कार्यकाळात मी धरून ८५ नगरसेवक होते. सर्वाशी माझा उत्तम संपर्क होता. सर्वाशी स्नेहपूर्ण संबंध होते. त्यामुळे काम करताना कधीच अडचण आली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दत्तोपंत मेहेंदळे यांचा निवडणूक प्रमुख म्हणून तीन निवडणुकांमध्ये मी काम केले. तिन्हीही वेळा दत्तोपंत निवडून आले. त्यांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवायची आहे असा निरोप मला घरी आला आणि १९८५ साली शिवाजी मंदिर वॉर्ड क्रमांक २६ येथून मी निवडणूक लढविली. काँग्रेसकडून राजाभाऊ पवार, शिवसेनेकडून डॉ. परांजपे विरोधात होते. चुरशीच्या लढतीत माझा विजय झाला.

अंकुश काकडे महापौर असताना मोबाईल सॅनिटरी युनिट तयार केले आणि ते महापालिकेला वॉर्डस्तरीय निधीतून बहाल केले. या युनिटमध्ये सर्व मिळून वीस प्रसाधनगृह, शौचालये अशी रचना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर केली होती. हे युनिट शहरभर कुठेही फिरवता येत असे. चिंतामणी पुरंदरे म्हणून माझे मित्र होते, त्यांची या कामी खूप मदत झाली. गणेशोत्सव आणि वारीमध्ये लाखो लोक पुण्यात येतात, तेव्हा स्वच्छता राहावी यासाठी हे युनिट सुरू केले. दिल्ली, कोलकाता, इंदूर, भोपाळ महापालिकांकडून आणि खुद्द लष्कराकडून या युनिटबाबत मला आणि पुणे महापालिकेला माहिती विचारली गेली, एवढे ते यशस्वी झाले.

शहरात कचरापेटय़ा भरून वाहात. त्यामुळे प्रत्येक प्रभागात हॉटेल चालकांनी त्यांच्या दारात एका पिशवीत कचरा भरून ठेवावा व एक ट्रक त्यांच्या दारात येऊन तो कचरा उचलेल, अशी कल्पना मी सुचविली आणि ती योजना सुरू झाली. महापालिका शिक्षकांच्या सहकार्याने महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील हुशार विद्यार्थ्यांसाठी नाना वाडय़ात रविवारी दुपारी तीन ते सहा मोफत वर्ग मी सुरू केले. त्या वर्गामध्ये मी स्वत: गणित शिकवायचो. त्या वर्गाच्या उपक्रमाचा परिणाम म्हणून महापालिका शाळांमधील विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. नाना बनकर यांनी हडपसरमध्ये आणि रिपाइंचे उद्धव वावरे यांनी नगर रस्त्यावर महापालिकेची शाळा सुरू केली. मात्र, त्यांना त्या शाळांसाठी निधी कमी पडत होता. त्या शाळांसाठी माझ्या वॉर्डस्तरीय निधीतून दोघांनाही निधी उपलब्ध करून दिला आणि शाळा सुरू झाल्या.

त्र्यंबकराव आपटे

नगरसेवक, विरोधी पक्षनेता तसेच महापालिकेच्या माध्यमिक व तांत्रिक शिक्षण समितीचे सदस्य आणि दोन वर्षे अध्यक्ष अशी पदे भुषविली आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trimbakrao aptee
First published on: 20-01-2017 at 04:00 IST