पुणे : हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ गावात असलेल्या एका फार्म हाऊसच्या परिसरातील नाल्यात बुडून अडीच वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी घडली.

कणक वर्धमान कोठारी (वय अडीच वर्ष) असे या दुर्देवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. कोठारी कुटुंबीय गुलटेकडी मार्केट यार्ड भागात राहायला आहेत. वर्धमान कोठारी बांधकाम व्यावसायिक आहेत. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे, अशी माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली.

सोलापूर रस्ता परिसरातील कोरेगाव मूळ गावात नेचर नेस्ट अॅग्रो टुरीझम नावाचे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर रविवारी सकाळी कार्यक्रमासाठी कोठारी कुटुंबीय आणि नातेवाईक आले होते. कौटुंबिक कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास कणकचे आई-वडील आणि नातेवाईक चहा पिण्यासाठी एका हॉलमध्ये आले होते. त्या वेळी कणक तेथे नसल्याने नातेवाईकांनी तिचा फार्म हाऊसच्या परिसरात शोध घेतला. त्यावेळी फार्महाऊस शेजारी असलेल्या जलतरण तलावाजवळ असलेल्या नाल्यात कणक पडल्याचे आढळुन आले. नातेवाईकांनी तिला त्वरीत पाण्यातुन बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. कणकचा मृत्यू झाल्यानंतर कोठारी कुटुंबीयांना धक्का बसला असून लोणी काळभोर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.