पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश करणारे माजी नगरसेवक चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून (अजित पवार गट) शरद पवार पक्षात प्रवेश केल्याने आरोपींनी दगडफेक केल्याचे कारण पुढे आले आहे.याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी रेवण तानाजी लगस (वय २०, रा.गोकुळ नगर, कात्रज) आणि प्राणजीत अच्युत शिंदे (वय २४, रा. हांडेवाडी) यांना अटक केली आहे. चंद्रकांत टिंगरे यांच्या पत्नी माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती.

धानोरी प्रभागाच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे आणि त्यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत टिंगरे दांपत्याने सुरुवातीला महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांना पाठिंबा दिला होता. निवडणुकीचा प्रचार सुरू असताना रेखा टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे यांनी पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करून बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा जाहीर केला होता.

हेही वाचा >>>बोट उलटल्याने दोघांचा पवना धरणात बुडून मृत्यू; मृतदेह शोधण्यात यश

चंद्रकांत टिंगरे आणि त्यांचे चालक १९ नोव्हेंबर रोजी धानोरी महावितरण कार्यालयासमोर गाडीत बसले असताना दोघांनी गाडी अडवली. त्यांच्या गाडीवर दगडफेक करून मारहाण केली ,अशी तक्रार रेखा टिंगरे यांनी दिली होती. महायुतीचे उमेदवार आणि आमदार सुनील टिंगरे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझे पतीवर जीवघेणा हल्ला केल्याचा थेट आरोप रेखा टिंगरे यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. त्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याचा राग मनात धरून दगडफेक केल्याचे आरोपींच्या चौकशीत समोर आले.- कांचन जाधव,वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलीस ठाणे</p>