पिंपरी : आळंदी आणि म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजाची शेती करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १६ लाख १३ हजार रुपये किमतीची ५५ गांजाची झाडे जप्त केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली कारवाई आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मरकळ गावातील बागवान वस्ती येथे करण्यात आली. गंगे माने कामी (५८, बागवान वस्ती, मरकळ, खेड, मूळ रा. नेपाळ) याला अटक करण्यात आली आहे. त्याने कामाला असलेल्या शेतामध्ये गांजाची झाडे लावली होती. दोन लाख १३ हजार रुपये किमतीची गांजाची १५ झाडे जप्त केली. कामी हा बागवान वस्ती येथील एका शेतामध्ये काम करत होता.

म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरेगाव खुर्द येथे कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये बाळू बबन गाळव (६५, कोरेगाव खुर्द, खेड) याला अटक करण्यात आली आहे. त्याने शेतामध्ये गांजाची ४० झाडे लावली. २८ किलो वजन असलेली १४ लाख रुपये किमतीची झाडे जप्त केली. त्याच्याकडे १२५० रुपयांचा २५ ग्रॅम तयार गांजा देखील आढळून आला. पोलिसांनी एकूण १४ लाख एक हजार २५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.