पुणे : बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कात्रजमधील आंबेगाव परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि काडतूस जप्त केले.
शुभम राजेंद्र बेलदरे (वय २९, रा. दत्तनगर, जांभुळवाडी रस्ता, आंबेगाव), मयूर ज्ञानोबा मोहोळ (वय २३, रा. नऱ्हे रस्ता, धायरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी मयूर भोकरे आणि रहीम शेख हे कात्रज भागात गस्त घालत होते. त्या वेळी दोघे जण थांबले असून, त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती भोकरे आणि शेख यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. दोघांनी पिस्तूल का बाळगले, तसेच त्यांनी कोणाकडून आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सहायक निरीक्षक राजेश माळगावे, उपनिरीक्षक रामेश्वर पारवे, रणजीत फडतरे, रहीम शेख, मयूर भोकरे, विजय कांबळे, नितीन बोराटे, नितीन कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार यांनी ही कामगिरी केली.
सराइतांकडून सात पिस्तुले जप्त
शहरात बेकायदा पिस्तूल बाळगण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. दहशत माजविण्यासाठी सराइत पिस्तूल बाळगतात. गेल्या चार दिवसांत पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत सराइतांकडून सात पिस्तुले आणि काडतुसे जप्त केली. दोन दिवसांपूर्वी गुन्हे शाखा यूनिट सहाच्या पथकाने वाघोलीतील भावडी रस्त्यावर सराइतांना पकडले. त्यांच्याकडून चार देशी बनावटीची पिस्तुले आणि पाच काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला.
या प्रकरणी पोलिसांनी सूरज उर्फ नन्या संतोष मोरे (१९, रा. वाघोली), ओंकार अरुण नादवडेकर (१९, रा. वाघोली), जगदीश उर्फ जॅक्स शंकर दोडमनी (२४), स्वयंम उर्फ आण्णा विजय सुर्वे (१९, रा. येरवडा) यांना अटक करण्यात आली. आरोपी सूरज याच्याविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. ओंकारविरुद्ध लोणीकंद पोलिसांत एक गुन्हा नोंद आहे. जगदीश याच्यावर लष्कर आणि येरवडा पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. भारती विद्यापीठ, वाघोली परिसरातून बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली.