पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हडपसर आणि कोंढवा परिसरात अपघाताच्या घटना घडल्या. कोंढवा भागात भरधाव दुचाकी समोरुन येणाऱ्या वाहनावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शानुर युनूस बागवान (वय ४१, रा. नवाजीश पार्क, कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार बागवान हे ५ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास कोंढव्यातील लुल्लानगर भागातून ज्योती हाॅटेल चाैकाकडे भरधाव वेगाने निघाले होते.

त्यावेळी गतिरोधकावर भरधाव दुचाकीस्वार बागवान यांचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी एका वाहनावर आदळली. दुचाकीस्वार बागवान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या बागवान यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

हडपसर-सासवड रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (७ ऑक्टोबर) सायंकाळी घडली.

दिनेश श्रीराम सिरसाठ (वय ३८) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत गणेश श्रीराम सिरसाठ (वय ४९, रा. मंगरूळ, ता. चिखली, जि. बुलढाणा)  यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार दिनेश हे मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हडपसर-सासवड रस्त्याने निघाले होते. त्यावेळी सातववाडी पीएमपी थांब्यासमोर भरधाव वाहनाने दुचाकीस्वार दिनेश यांना धडक दिली. अपघातात दिनेश हे गंभीर जखमी झाले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक रोकडे तपास करत आहेत.

आठवडभरात सहा जणांचा मृत्यू

शहरात गंभीर स्वरुपांच्या अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आठवडभरात शहर, तसेच उपनगरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतांस अपघात भरधाव वेगामुळे झाले आहेत.