पुणे : पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या अनेक तक्रारी केल्या जात होत्या. मात्र याकडे कधीही कोणी गांभीर्याने पाहिले नाही. मात्र महापालिकेत आयुक्तपदी रुजू झालेल्या नवल किशोर राम यांनी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर वचक निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.
बाणेर परिसरात मान्य नकाशाव्यतिरिक्त सहाव्या आणि सातव्या मजल्याचे बांधकाम केल्याची माहिती समजल्यानंतरही महापालिकेला ती लक्षात आणून न दिल्याबद्दल महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कनिष्ठ अभियंता आणि उप अभियंत्यावर कारवाई करून त्यांना निलंबित केले आहे.
या दोघांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. टीडीआर विभागातील कनिष्ठ अभियंता शुभांगी तरुकमारे आणि उपअभियंता संदीप मिसाळ असे निलंबन केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
बाणेर येथील मालमत्ता क्रमांक २१६, हिस्सा नंबर ६ या ठिकाणी एका इमातीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीला केवळ ५ मजले बांधकाम करण्याच्या नकाशाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, मान्य नकाशाव्यतिरिक्त इमारतीच्या सहाव्या आणि सातव्या मजल्याचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. संबधित विकसकाने सहावा आणि सातवा मजल्याच्या बांधकामासाठी महापालिकेकडे प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, त्याला मंजुरी देण्यात आली नव्हती.
या बांधकाम प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्या वेळी सहाव्या मजल्याचे स्लॅबचे काम पूर्ण झालेले दिसले. तसेच, सातव्या मजल्याचे बांधकाम सुरू असल्याचेही पाहणीमध्ये आढळले. ही बाब कनिष्ठ अभियंता शुभांगी तरुकमारे आणि उपअभियंता संदीप मिसाळ यांनी महापालिकेच्या लक्षात आणून दिली नाही. त्यामुळे कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवण्यात आला.
आयुक्त नवल किशोर राम यांच्या निदर्शनास ही माहिती आणून दिल्यानंतर आयुक्त राम यांनी ही बाब गंभीर्याने घेऊन सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजयकुमार थोरात यांना या दोन्ही कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले. आदेशानुसार तरुकमारे आणि मिसाळ यांना खातेनिहाय चौकशी पूर्ण होईपर्यंत सेवेतून सोमवारपासून (२० ऑक्टोबर) निलंबित करण्यात आले.
स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या चौघांवर कारवाई
स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने घोले रस्ता-शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आणि दोन मुकादम यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आयुक्त नवल किशोर राम यांनी रविवारी या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील दीप बंगला चौक ते वडारवाडी रस्ता या भागाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसला. या भागात महापालिकेचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. आयुक्तांनी जागेवरूनच फोन करून अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. त्यावेळी त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे परिमंडळ दोनचे उपायुक्त संतोष वारुळे यांना संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. उपायुक्त वारुळे यांनी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनील कांबळे यांना पाच हजार रुपये, आरोग्य निरीक्षक संगीता बदामी यांना चार हजार रुपये, मुकादम ललित मकवाणी आणि राज साळवी यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.