पुणे : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून बेकायदा गॅस भरणा करताना झालेल्या स्फोटात दोघे जखमी झाल्याची घटना धायरी भागात सोमवारी रात्री घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी दुकानमालकासह दोघांविरुद्ध नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महेश वासुदेव वाडीकर (रा. बिदर, कर्नाटक), गणेश दत्तात्रय पाटील (रा. लातुर) अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णलयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत पोलीस कर्मचारी संग्राम शिनगारे यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी शेषनाग अप्लायन्सेस या दुकानाचे मालक आशिष अशोक मोरे (रा. धायरी) याच्यासह जखमी कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे याचे धायरी परिसरात शेषनाग अप्लायन्सेस हे दुकान आहे. या दुकानात घरगुती वापराच्या सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये बेकायदा गॅस भरणा करण्यात येत होता. सोमवारी रात्री स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये बेकायदा गॅस भरणा करण्यात येत होता. त्या वेळी अचानक गॅस गळती झाली आणि स्फोट झाला. कामगार वाडीकर आणि पाटील हे स्फोटात होरपळले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्फोटात होरपळलेल्या कामगारांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव तपास करत आहेत.