पुणे : शहरातील नवले पूल परिसर आणि कात्रजमधील गुजरवाडी फाटा येथे दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटनांमध्ये महिलेसह दोघांचा मृत्यू झाला असून, एक जखमी झाला आहे. दोन्ही अपघातांत ट्रकचालकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्याने संबंधित चालकांविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाणे आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात मंगळवारी (८ जुलै) रात्री साडेअकराच्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक अजित गोपाळ जवंडरे (वय २४, रा. चिंचोली, लातूर) याचा मृत्यू झाला, तर दुचाकीवरील सहप्रवासी अभिषेक मोरे (वय २४) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी अभिषेक मोरे याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रकचालक किशन देवीलाल नायक (वय ३०, रा. राजस्थान) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. फिर्यादी अभिषेक आणि मयत अजित हे दोघे मित्र असून ते लातूरचे रहिवासी आहेत. फिरण्यासाठी ते पुण्यात आले होते.

दुसरी घटना ही बुधवारी (९ जुलै) सकाळी दहाच्या सुमारास कात्रजमधील गुजरवाडी फाटा परिसरात घडली. प्राची रोहित बागुल (वय २५, रा. मांगडेवाडी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत महिलेचे पती रोहित बागुल (वय २८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित आणि त्यांची पत्नी दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. यात प्राची यांचा जागीच मृत्यू झाला, तर रोहित किरकोळ जखमी झाले. ट्रकमध्ये बांधकामासाठी लागणाऱ्या विटांची वाहतूक सुरू होती. उतारावरून निष्काळजीपणे ट्रक चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.