पुणे : व्यापाऱ्याचे अपहरण करुन त्याच्याकडील दागिने आणि रोकड लुटणाऱ्या दोघांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) दोषी ठरवून विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी सात वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी १५ लाख रुपयांचा दंड ठोठाविला.
सूरज उर्फ सुब्बा रवींद्र कांबळे (वय ३१, रा. रामनगर, येरवडा), निलेश संजय सस्ते (वय २३, रा. केळेवाडी, कोथरूड) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका व्यापाऱ्याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार व्यापारी कोंढवा भागात राहायला आहे. ३ नोव्हेंबर २०१६ रोजी कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावरुन व्यापारी मोटारीतून निघाले होते. त्या वेळी आरोपी कांबळे आणि सस्ते यांनी त्यांना अडवले. आरोपी मोटारीतून त्यांच्या मागावर होते. आरोपींनी व्यापाऱ्याची मोटार अडविली. आरोपींनी व्यापाऱ्याला धमकावून त्यांच्या मोटारीत बसण्यास सांगितले. व्यापाऱ्याकडील सोनसाखळी, अंगठी, मोबाइल संच, रोकड असा ऐवज लुटून आरोपी पसार झाले.
आरोपींनी अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले होते. संघटित स्वरुपात आरोपींनी गुन्हे केल्याचे उघडकीस आल्यानंतर दोघा आरोपींविरुद्ध ‘मकाेका’ अन्वये कारवाई करण्यात आली. तत्कालिन सहायक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ, कोंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर, सहायक निरीक्षक विशाल वळवी यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता. न्यायालयीन कामकाजात महेश जगताप यांनी सहाय केले. आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केल्यानंतर सुनावणी सुरू झाली. अतिरिक्त सरकारी वकील फरगडे यांनी आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती न्यायालयाकडे युक्तिवादात केली. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींना दोषी ठरविले. विशेष न्यायालयाने दोघांना सात वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी १५ लाख रुपयांचा दंड ठोठाविला. न्यायालयाने आरोपींना मोठा दंड ठोठाविल्याने संघटित गुन्हेगारी करणाऱ्या सराइतांना चाप बसणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी न्यायालयीन कामकाजात सहाय केले.