लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास अधिक जलद तसेच सोयीस्कर करण्याच्या दृष्टिकोनातून दोन भुयारी मार्गांचा प्रस्ताव कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी मांडला आहे. ऐतिहासिक शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या दोन ठिकाणी हे मार्ग प्रस्तावित करण्यात आले असून या प्रस्तावाला गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजी भोसले यांची रासने यांनी भेट घेत प्रकल्पांच्या मंजुरीसाठी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी, अशी मागणी रासने यांनी केली.

ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळे तसेच प्रमुख बाजारपेठा शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने या परिसरात दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. परिणामी, वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रस्तावित भुयारी मार्ग हे या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरणार असून, पुणेकरांसाठी हा एक महत्त्वाचा बदल ठरणार आहे, असा दावा रासने यांनी केला.

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या मंजुरीसाठी अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, पुढील आठवड्यात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन भोसले यांनी दिल्याचे रासने यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, खडकमाळ आळी येथील पोलीस वसाहतीच्या जीर्ण झालेल्या इमारतींची नव्याने उभारणी करण्यासंदर्भात राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचीही रासने यांनी भेट घेतली.