पुणे : प्रतिष्ठित क्वॅकेरली सायमंड्स (क्यूएस) जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२६मध्ये पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिम्बायोसिस विद्यापीठ यांनी स्थान उंचावले आहे. क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ५६६व्या, तर सिम्बायोसिस विद्यापीठ ६९६व्या स्थानी आहे.
क्यूएस क्रमवारी जागतिक स्तरावर महत्त्वाची मानली जाते. जगभरातील १५००हून अधिक विद्यापीठांचा २०२६च्या क्रमवारीत समावेश आहे. यंदाही अमेरिकेतील मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने अग्रस्थान कायम राखले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या क्रमवारीत सुमारे ५०० विद्यापीठांच्या क्रमवारीत सुधारणा झाल्याचे क्यूएसने नमूद केले आहे. भारतातील ५४ विद्यापीठांना या यादीत स्थान मिळाले आहे.
विद्यापीठातील प्राध्यापकांची संख्या कमी होत असूनही संशोधन कामगिरी, रोजगारक्षम निर्देशांकात वाढ झाली आहे. २०२५ च्या तुलनेत विद्यापीठाचे स्थान ७५ स्थानांनी सुधारले आहे. राष्ट्रीय पातळीवरील आयआयटी, आयआयएम, इतर केंद्रीय संस्था, विद्यापीठांसारख्या सर्वोच्च शिक्षण संस्थांच्या पंक्तीत विद्यापीठ १५ व्या स्थानी आहे, तर महाराष्ट्रात आयआयटी मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकावर, सार्वजनिक राज्य विद्यापीठांत अव्वल स्थानी आहे. या यशात विद्यार्थ्यांना नोकरी, रोजगार, उद्योजकतेत मिळणाऱ्या संधीत गुणात्मक व संख्यात्मक पातळीवर झालेली लक्षणीय वाढ, संधी कारणीभूत आहे.
या पुढील काळात विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर सुधारण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी-शिक्षक आदानप्रदान, शिक्षण संस्था व उद्योगसमूहांशी अधिक परिणामकारकपणे वाढवला जाईल. तसेच दुहेरी पदवी, शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरणासह राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील दृष्टिकोनाशी सुसंगत अध्यापन, संशोधन आणि जागतिक सहभागाची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले.