नारायणगाव : पुणे, पिंपरी चिंचवड शहर, नवी मुंबईसह नगर, नाशिक, हिंगोली, औरंगाबाद या जिल्ह्यांतून गेल्या तीन वर्षांपासून दुचाकी वाहने चोरणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना आळेफाटा पोलिसांनी अटक असून, त्यांच्याकडून २३ लाख रुपये किमतीच्या ४५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. झटपट पैसा मिळविण्यासाठी ते दुचाकी चोरी करून त्यांची विक्री करीत असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे आणि पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी याबाबतची माहिती दिली.

प्रमोद लक्ष्मण सुरकंडे (वय २६) ज्ञानेश्वर रंगनाथ बिबवे (वय २२) गणेश फक्कड कारखिले (वय २३) आणि आदिल मुक्तार अहमद कुरेशी (वय २१ सर्व रा. निघोज तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर-कल्याण महामार्गावर गुंजाळवाडी येथे दिनांक २९ मे रोजी दुपारच्या सुमारास रस्तालगत उभ्या असलेल्या शांताबाई बबन पावडे यांचे गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञाताने जबरदस्तीने ओढून चोरून नेल्याची तक्रार आळेफाटा पोलीस ठाण्यात आली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी तपास सुरू केला होता.

सीसीटीव्ही चित्रीकरण आणि तांत्रिक माहितीच्या आधारे यातील अनोळखी व्यक्ती हा निघोज येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीस पथकाने संशयित प्रमोद लक्ष्मण सुरकुंडे याला ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. प्रमोद सुरकंडे याच्यावर २०२१ मध्ये अहमदनगर तोफखाना पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा असल्याचे तपासात उघड झाले. एक नव्हे, तर तब्बल ४५ दुचाकी ज्ञानेश्वर बिबवे, गणेश कारखिले व आदील कुरेशी यांचे मदतीने त्याने चोरल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संबंधितांना पारनेर तालुक्यातील निघोज येथून ताब्यात घेऊन अटक केली. त्यांनी या दुचाकी आळेफाटा, नारायणगाव, ओतूर, शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर, पुणे, पिंपरी- चिंचवड तसेच हिंगोली, औरंगाबाद, नाशिक व नवीमुंबई आदी भागातून चोरल्याची कबुली दिली. झटपट पैसा कमविण्याचे उद्देशाने संबंधित दुचाकी चोरून त्यांची विक्री करत होते, असेही तपासात स्पष्ट झाले आहे.