पुणे : कात्रज भागातून दोन वर्षांच्या बालिकेचे अपहरण प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन वर्षांच्या बालिकेची आरोपीच्या तावडीतून धाराशिव परिसरातून सुखरुप सुटका केली. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
सुनील सिताराम भोसले (वय ५१, रा. मोतीझारा), शंकर उजन्या पवार (वय ५०), गणेश बाबु पवार (वय ३५), शालुबाई प्रकाश काळे (वय ४५, तिघेही रा. डिकमाळ, ता. तुळजापुर, जि. धाराशिव) मंगल हरफुल काळे (वय १९, रा. खडकी रेल्वे लाईन झोपडपट्टी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी न्यायालयाने २ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
कात्रजमधील वंडरसिटी परिसरात एक वसाहत आहे. या वसाहतीतून शुक्रवारी (२५ जुलै) मध्यरात्री दोन वर्षांच्या बालिकेचे अपहरण करण्यात आले होते. याबाबत तिच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. बालिकेला घरातील पाळण्यात ठेवले होते. मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या दाम्पत्याचे लक्ष नसल्याची संधी साधून आरोपींनी तिचे अपहरण केले होते. दोन वर्षांच्या बालिकेचे अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता.
कात्रज परिसरापासून ते पुणे रेल्वे स्थानकापर्यंत पोलिसांनी १४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले होते. त्या वेळी त्यांना तिघे जण बालिकेला पुणे रेल्वे स्थानकाकडे जात असल्याचे दिसून आले होते. तपासात आरोपी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर भारती विद्यापीठ आणि गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून अपहरण केलेल्या बालिकेची सुटका करण्यात आली.
आरोपींची चौकशी करण्यात आली. तेव्हा अपहरण केलेल्या बालिकेचा वापर भीक मागण्यासाठी करण्यात येणार असल्याची कबुली आरोपींनी दिली. परिमंडळ दाेनचे पोलीस उपायुक्त मिलींद मोहीते , सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, अंजुम बागवान, जितेंद्र कदम, कुमार घाटगे, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कवठेकर,अमोल रसाळ,स्वप्नील पाटील, वैभव मगदूम, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, शंकर कुंभार, आबा मोकाशी, विजय पवार, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, संजय आबनावे, ओम कुंभार, संतोष टकले, राहुल शिंदे, साधना ताम्हाणे, तसेच धाराशिव ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेचे हवालदारसमाधान वाघमारे आणि पथकाने ही कामगिरी केली.