पुणे: पुण्यातील एका साहसी पर्यटन केंद्रातील जलतरण तलावात बुडून दोन तरुणांच्या मृत्यू प्रकरणी केरळमधील एर्नाकुलम येथील ग्राहक तक्रार निवारण मंचाने एक कोटी ९९ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. पर्यटन केंद्राने सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे निरीक्षण नोंदवून नुकसान भरपाईचे आदेश देण्यात आले आहेत. २५ ऑक्टोबर २०२० रोजी ही दुर्घटना घडली होती.

एर्नाकुलम येथील कुटुंब पुण्यातील साहसी पर्यटन केंद्रात आले होते. त्यावेळी जलतरण तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. पर्यटन केंद्रातील व्यवस्थपनाने सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याची तक्रार मुलांच्या आई-वडिलांनी दिली होती. साहसी पर्यटन केंद्रात सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले होते. प्रत्यक्षात तेथे जीवरक्षक नव्हते, तसेच सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या नसल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. सीसीटीव्ही कॅमेरे नादुुरुस्त असल्याचे म्हटले होते.

हेही वाचा… पिंपरी: बालगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचे महत्वाचे पाऊल; विद्यार्थ्यांसाठी ‘हा’ उपक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालकांच्या तक्रारीनंतर साहसी पर्यटन केंद्राच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन मुलांचा मृत्यू, तसेच सदोष सेवा दिल्याने मुलांच्या आई-वडिलांनी एर्नाकुलम येथील ग्राहक तक्रार निवारण केंद्रात दावा दाखल केला होता. त्यांनी सहा कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती. एर्नाकुलम येथील ग्राहक तक्रार निवारण मंचात दाव्यावर सुनावणी झाली. ग्राहक तक्रार निवारण मंचाने साहसी पर्यटन केंद्राच्या व्यवस्थापनाला एक कोटी ९९ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. नुकसान भरपाईची रक्कम १२ टक्के व्याजाने परत देण्याचे आदेशात म्हटले आहे.