पुणे : ‘डॉ. माशेलकर समितीच्या अहवालात आधी केवळ मराठी आणि इंग्रजी बारावीपर्यंत सक्तीची होती. मात्र, त्यात नंतर बदल करून हिंदी सक्तीची करण्यात आली. त्यामुळे आता हिंदी सक्ती नको म्हणून सांगत आहेत, तेच हिंदीची सक्ती करणारे आहेत,’ असे सांगून मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा शिकवण्यावरून बराच वाद झाला होता. त्या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिलीपासून तिसरी भाषा शिकवण्याच्या निर्णयाला स्थगिती देत डॉ. नरेंद्र जाधव यांची समिती नियुक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाच्या अनावरण कार्यक्रमात सामंत यांनी तिसऱ्या भाषेच्या मुद्द्यावर डॉ. माशेलकर समितीचा संदर्भ देऊन भाष्य केले.
महाविकास आघाडी सरकार असताना उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होते. त्यांच्याच काळात राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलबजावणीसाठी डॉ. रघुनाथ माशेलकर यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. त्याचा संदर्भ देत सामंत म्हणाले, ‘डॉ. माशेलकर समिती मी स्थापन केली. पण मला ती करायला लावली. त्या समितीत पक्षाचे पदाधिकारी टाकायला लावले. माशेलकर समितीचा मंत्रिमंडळासमोर अहवाल आला. त्याआधी तो अहवाल मी वाचला होता. मात्र, त्यात परिच्छेद वाढवून हिंदी सक्तीची करण्यात आली होती. त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. आधी समितीने मराठी आणि इंग्रजी बारावीपर्यंत सक्तीची केली होती. नंतर ते बदलण्यात आले.
पक्षाचे पदाधिकारी समितीमध्ये येतात, त्यावेळी अशा प्रकारचे उद्योग होतात. ती समिती शासनाची होती, की पक्षाची होती हा प्रश्न आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी बारावीपर्यंत सक्तीची झाली पाहिजे हा ठराव उदय सामंतने नाही केला. हे माहीत असावे म्हणून सांगणे आवश्यक आहे. नाही तर, नाहक मुख्यमंत्री आणि त्यावेळचे मुख्यमंत्री बदनाम होतात. आमच्या सरकारने कधीही हिंदी सक्तीची केलेली नाही. राजकारणासाठी ‘फेक नॅरेटिव्ह’ तयार करतात. त्याला अनेक लोक बळी पडले. मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देऊन डॉ. नरेंद्र जाधव यांची समिती नियुक्त केली आहे. पण, आपण मूळ काय आहे हे शोधत नाही.’
‘आम्हाला तोंड सोडता येत नाही असे नाही…’
‘सकाळ, दुपार, संध्याकाळच्या पत्रकार परिषदांवर विश्वास ठेवू नका. राजकारण्यांनी असंबंध बोलायला सुरुवात केली, की त्याची ब्रेकिंग न्यूज होते. आम्ही असंबंध बोलत नाही म्हणून आमची ब्रेकिंग न्यूज होत नाही. मात्र, आता सकाळी साडेनऊच्या आधी असंबंंध बोलायचे, असा संकल्प केला पाहिजे. आम्ही राजकीय तत्त्व पाळतो. आम्हाला तोंड सोडता येत नाही असे नाही,’ अशा शब्दांत सामंत यांनी खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता टोला लगावला.