scorecardresearch

दूरदर्शनवरील मालिका पहा ; यूजीसीची विद्यापीठे, महाविद्यालयांना सूचना

यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी या संदर्भातील परिपत्रकासह मालिकेचे वेळापत्रकही संकेतस्थळावर गुरुवारी प्रसिद्ध केले.

दूरदर्शनवरील मालिका पहा ; यूजीसीची विद्यापीठे, महाविद्यालयांना सूचना
(संग्रहित छायाचित्र)

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दूरदर्शनने निर्मिती केलेली ‘स्वराज : भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा’ ही मालिका पाहण्याची, मालिकेवर आधारित प्रश्नमंजुषा आयोजित करण्याची सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील उच्च शिक्षण संस्था आणि संलग्न महाविद्यालयांतील शिक्षक, विद्यार्थ्यांना केली आहे. यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी या संदर्भातील परिपत्रकासह मालिकेचे वेळापत्रकही संकेतस्थळावर गुरुवारी प्रसिद्ध केले.

केंद्र सरकारकडून देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होत असल्यानिमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने दूरदर्शनने ‘स्वराज : भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा’ या ७५ भागांच्या भव्यदिव्य मालिकेची निर्मिती केली आहे. या मालिकेतून १५व्या शतकापासून स्वातंत्र्य संग्रामापर्यंतचा गौरवशाली इतिहास आणि विशेषकरून अपरिचित नायकांच्या कथा मांडण्यात आल्या आहेत. देशाचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासह पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा या मालिकेचा भर आहे, असे यूजीसीच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. उच्च शिक्षण संस्था आणि संलग्न महाविद्यालयांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना त्यांचे मित्र आणि कुटुंबियांसमवेत ही मालिका पाहण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच स्वराज्य या विषयावर आधारित प्रश्नमंजुषेचे संस्थेमध्ये आयोजन करून त्यांचा राष्ट्रीय चळवळीतील सहभाग वाढवावा, असेही नमूद करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.