काँग्रेसचे माजी नगरसेवक सतीश दरेकर यांचे थेरगाव-वाकड मार्गावरील ‘सतीश एक्झिक्युटिव्ह’ हे आलिशान हॉटेल पाडण्याची कारवाई पिंपरी महापालिकेने सोमवारी सुरू केली. मात्र, दर्शनी भाग पाडल्यानंतर ही कारवाई अध्र्यावर थांबवण्यात आली.
सतीश दरकेर यांनी २००४-०५ मध्ये हे हॉटेल बांधले, त्या वेळी शेजारील ‘श्रीरंग विहार’ या सोसायटीने हॉटेलच्या अनधिकृत बांधकामाविषयी महापालिकेकडे तक्रार केली होती. तथापि, पालिकेने अपेक्षित कारवाई न केल्याने सोसायटीतील रहिवासी न्यायालयात गेले. तेव्हा न्यायालयाने महापालिका प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशास दरेकरांनी आव्हान देत स्थगिती मिळवली. मात्र, नंतर ती उठली. हॉटेलचे अनधिकृत बांधकाम स्वत:हून काढून घेण्यासाठी दरेकरांना चार आठवडय़ांची मुदत देण्यात आली. या कालावधीत त्यांनी काहीच हालचाल न केल्याने मुदत संपताच पालिकेने पाडापाडी कारवाई सुरू केली. हॉटेलचा दर्शनी भाग पाडण्यात आला असून उर्वरित कारवाई उद्या सुरू ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात, महापालिकेचे उपशहर अभियंता पठाण यांनी सांगितले, की रहिवासी भागातील मजबूत व मोठी इमारत असल्याने एकाच वेळी ती पाडता येत नाही. त्यासाठी मशिनरी व पुरेसा पोलीस बंदोबस्त आवश्यक आहे. त्यामुळे कारवाई थांबवण्यात आली. आतील साहित्य काढून घेण्यास सांगण्यात आले असून उद्या पुन्हा कारवाई होणार आहे.