बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनामध्ये कापण्यात आलेल्या अडीच हजार किलोच्या केकचा फटका नागपूर येथील छायाचित्र कलाकारांना शुक्रवारी बसला. महापालिका प्रशासन आणि रंगमंदिर व्यवस्थापनाने कलादालन स्वच्छ करण्याची जबाबदारी उचलण्यामध्ये कसूर केल्याने उपराजधानीतून आलेल्या कलाकारांसमोर पुण्याच्या सांस्कृतिक संपन्नतेचे वाभाडे निघाले. अस्ताव्यस्त पडलेले सामान आणि घाणीच्या साम्राज्यामध्ये या छायाचित्रकारांना त्यांचे प्रदर्शन भरविता आले नाही. त्यामुळे रंगमंदिर आणि कलादालनाच्या स्वच्छतेची जबाबदारी कोणाची हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीचे औचित्य साधून २ हजार ६५० किलो वजनाचा केक महाराष्ट्र हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटतर्फे तयार करण्यात आला होता. हा केक तयार करण्यासाठी १४ विद्यार्थ्यांना शंभर तास लागले होते. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते गुरुवारी (१४ एप्रिल) हा केक कापण्यात आला. मात्र, त्यानंतर कलादालनाची स्वच्छता कोणी केली नाही. त्यामुळे तेथे घाणीचे साम्राज्य पसरले. तर, कलादालनाच्या पायऱ्यांवर पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला होता. नागपूर येथील डायमेन्शन फोटोग्राफर्स क्लबच्या कलाकारांचे नागपूरचा वारसा कथन करणारे छायाचित्र प्रदर्शन शुक्रवारपासून भरविण्यात आले होते. व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे कलाकारांना हे कलादालन उपलब्ध होऊ शकले नाही.
सांस्कृतिक नगरीमध्ये प्रदर्शन भरविता येणार म्हणून मोठय़ा आशेने येथे आलो होतो. २३ ठिकाणची १६७ छायाचित्रे या प्रदर्शनात लावण्यात येणार होती. मात्र, येथे उपेक्षाच पदरी आल्याची भावना क्लबच्या सदस्या संगीता महाजन यांनी व्यक्त केली. दरम्यान, रंगंमदिर व्यवस्थापनाने कलादालन स्वच्छता सुरू केली असून आता शनिवारी (१६ एप्रिल) या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.