केंद्रीय अर्थसंकल्प छाप सोडू शकलेला नाही; उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी व्यक्त केली नाराजी

स्वामीनाथन आयोग शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी आणखी चार वर्षे वाट पहावी लागणार

उद्योगमंत्री सुभाष देसाई. (संग्रहित)

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अर्थसंकल्पावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पाने माझ्यावर छाप सोडली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना शहराधक्ष योगेश बाबर, सुलभा उबाळे आदी उपस्थित होते.


देसाई म्हणाले, स्वामिनाथन आयोग अहवालाच्या अंमलबजावणीचे वचन सत्तारूढ भाजपाने निवडणुकीपूर्वी दिले होते. त्यात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा दीडपट भाव देण्याचे तत्व होते. केवळ घोषणाच केली त्याला आता तीन वर्षे उलटून गेली तरीही या सरकारने तो भाव दिलेला नाही आणि आता २०२२ला तो देऊ असे आज म्हणत आहेत. त्यामुळे आणखी चार वर्षे शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र, तोपर्यंत सरकारने शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करायला हवी, अन्यथा त्यांच्या हालअपेष्टा थांबणार नाहीत, असे देसाई म्हणाले.

देसाई म्हणाले, पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची भीती आहे. कारण गेल्या दोन-तीन वर्षात तेलाचे भाव कमी झाले होते, त्यावर कर लावण्यात आल्याने नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. आता तर तेलाचे भाव वाढू लागलेत, त्यामुळे पुढील वर्षी पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला फिडणार आहेत. नागरिकांना ते खरेदी करणे शक्य होणार नाही, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रात सरकारला तीन वर्षे झाले आहेत. सगळे समाधानी झाले आहेत असे म्हणता येणार नाही, अनेक प्रश्न राहिले आहेत. शिवसेनेची सातबारा कोरा ही मागणी पूर्ण झालेली नाही. ऑनलाईनच्या गुंत्यात शेतकरी अडकून पडला याचे समाधान आम्ही कसे व्यक्त करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर २०१९ला आम्ही स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी शिवसेनेच्यावतीने केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Union budget could not be left to print industry minister subhash desai expressed his disappointment

ताज्या बातम्या