पुणे : ‘गुणवत्ता व अभिनवतेचे शहर ही कायमच पुण्याची ओळख राहिलेली आहे. उडाण योजनेंतर्गत हवाई जोडणीचा विस्तार आणि प्रवासी वाहतुकीतील वाढ यामुळे या भागातील तरुणांना योग्य वेळी कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध होत आहेत,’ असे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी केले.
विमानवाहतूक क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्य विकासासाठी ‘ग्लोबल फ्लाइट हँडलिंग सर्व्हिसेस’ची प्रशिक्षण शाखा असलेल्या ‘ग्लोबल स्कूल ऑफ एव्हिएशन’तर्फे प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ‘ग्लोबल फ्लाइट हँडलिंग सर्व्हिसेस’च्या व्यवस्थापकीय संचालिका सरिता कुमारी उपस्थित होत्या. ‘एरोमॉल’मध्ये हे प्रशिक्षण केंद्र सुरू झाले असून, त्यात विमानचालन प्रशिक्षण मिळणार आहे.
‘ग्लोबल स्कूल ऑफ एव्हिएशन’च्या पुण्यातील केंद्रात विमानतळ ग्राउंड हँडलिंग, केबिन क्रू प्रशिक्षण, विमानतळ संचालन व व्यवस्थापन या विषयाचे पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि पदवी अभ्यासक्रम एएमईटी विद्यापीठाच्या सहयोगाने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विमानतळ संचालनाच्या प्रक्रियेचा थेट आणि प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. प्रशिक्षणार्थींना ग्लोबल फ्लाइट हँडलिंग सर्व्हिसेसच्या तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे,’ अशी माहिती सरिता कुमारी यांनी दिली.