केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे भरसभेत आपल्या अंगावरचा फाटका शर्ट दाखवत म्हणाले, …

पुण्यातल्या सभेत बोलताना आपल्या साधेपणाचा दाखला देताना त्यांनी आपला फाटका शर्ट दाखवला.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. पुण्यातल्या एका सभेत बोलतानाही त्यांनी अशीच फटकेबाजी करत सभेला हसवलं. यावेळी त्यांनी भरसभेत आपल्या अंगातला फाटलेला शर्ट सभेला दाखवला आणि आपल्या साधेपणाचा दाखला दिला.

यावेळी सभेत बोलताना ते म्हणाले, मी सगळी पदं उपभोगली. मला मतदारसंघातील लोकांनी भरभरुन पदं दिली, मी केंद्रात तीनवेळा मंत्री जरी झालो असलो तरी साधेपणा सोडला नाही. काल मी हैद्राबादला आमच्या एका मित्राकडे गेलो होतो. मोठा माणूस आहे तो, तेव्हा तो म्हणाला, दादा तुम्ही खादीचा शर्ट घ्या. का तर म्हणाला तुमचा शर्ट फाटलाय. नवीन शर्ट घ्या. मी म्हटलं शर्ट फाटलाय म्हणून काय फरक पडला? आता इथे तुम्ही सगळे पुण्याची माणसं आहेत. यात कुणी फाटक्या शर्टचा माणूस येऊन बसलाय का मला सांगा बरं? घरातील बाईने तुम्हाला सांगितलं असेल, तुमचा शर्ट फाटलाय, बदलून घ्या. असा कुणी माणूस आहे का फाटलेला शर्टाचा? बघा माझा शर्ट इथे फाटलाय, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी मंचावरच त्यांचा फाटलेला शर्ट दाखवला.

यावेळी त्यांनी रेल्वेच्या खासगीकरणाच्या धोरणावरही भाष्य केलं आहे. चांगली रेल्वेसुविधा द्यायची तर पैसा पण तसाच लागेल. पैसा कुठून आणणार? भाडं तर वाढवू शकत नाही. म्हणून आम्ही काही रेल्वे खासगीत चालवायला दिल्या, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. “चांगले डबे आणि चांगली सेवा द्यायची आहे. पण रेल्वे चालवायची असेल तर पैसा कुठून आणायचा? भाडे तर वाढवू शकत नाही. आता काही रेल्वे आम्ही’ खासगीत चालवायला देत आहोत. समजा पाटलांनी आज बाईक घेतली आणि त्यांनी उद्या म्हटलं दानवे मला रेल्वे चालवायची आहे. मीच भाडं वसूल करेल त्याचं. तर तेही द्यायला तयार आहोत, असं सांगतानाच दोन रेल्वे खासगी कंपनीला चालवायला दिल्या”, असंही दानवे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Union minister of state raosaheb danve showed his torn shirt at punes maharashtra during speech vsk

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी