शिक्षण विभागाच्या वर्षभरातील कामकाजाची वेळापत्रक असलेली अनोखी दिशादर्शिका पहिल्यांदाच तयार करण्यात आली आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या पुढाकारातून ही दिशादर्शिका तयार करण्यात आली असून, त्यात दर महिन्याला होणाऱ्या भेटी, तपासणी, आढावा बैठका, सुनावण्या आदी कामांचे सविस्तर नियोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> पुणे : पतसंस्थांना गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर प्राप्तिकर नाही
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दिशादर्शिका आणि शिक्षणगाथा या त्रैमासिकाचे प्रकाशन मुंबईत झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले. शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक कैलास पगारे, उपसचिव समीर सावंत, योजना संचालक डॉ. महेश जगताप, माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, योजना उपसंचालक राजेश क्षीरसागर आदी या वेळी उपस्थित होते. शिक्षण विभागातील शिक्षण आयुक्तालय, प्राथमिक शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, योजना संचालनालय, आठ विभागीय उपसंचालक कार्यालये, ३६ जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांच्या वर्षभरातील कामकाजाचा दिनांकनिहाय समावेश दिशादर्शिकेमध्ये करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> पुणे : बोरे काढण्यासाठी दुकानाच्या छतावर उतरलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, की राज्यातील काही संस्था, कार्यालये आपल्यापुरती मर्यादित कामकाजाची दिनदर्शिका तयार करत होत्या. मात्र पहिल्यांदाच शिक्षण आयुक्तालयाची दिनदर्शिका अर्थात दिशादर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. त्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली होती. या दिशादर्शिकेमुळे शिक्षण विभागामध्ये नियोजित काम आणि अचानक आलेले काम यात सुसूत्रता राखणे शक्य होईल.