मुंबई-बंगळुरू बाह्य़वळण मार्ग सदैव गजबजलेला असतो. या मार्गावरील दरीपूल हा काहीसा भयावह वाटतो. सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांचे या पुलावर नेहमी अपघात होतात. या पुलावर एक चारचाकी वाहन थांबले. अंधारात थांबलेल्या वाहनातून उतरलेल्या एकाने चादरीत गुंडाळलेला महिलेचा मृतदेह दरीपुलावरून टाकून दिला. कोणाला काही कळण्याच्या तो वाहनचालक पसार झाला. या भागात चादरीत मृतदेह गुंडाळून ठेवला असल्याची माहिती दुसऱ्या दिवशी, ११ जानेवारी रोजी सायंकाळी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तांत्रिक तपास, खबऱ्यांचे जाळे आणि घटनास्थळावर सापडलेल्या टॉवेलच्या आधारे पोलिसांनी गेले वर्षभर या खुनाचा तपास केला. मात्र, या तपासात पोलिसांना प्रत्येक शक्यतेवर अपयश आले. दरीपुलावरून टाकून देण्यात आलेली महिलेची ओळख देखील अद्याप पटलेली नाही. तिच्या खुनामागचे गूढ अद्याप तरी पोलिसांना उकलता आलेले नाही. ‘गुन्ह्य़ाला एक दिवस वाचा फुटते’ या विश्वासावरच पोलिसांचा तपास सुरू आहे..

दरीपुलाच्या खाली जांभूळवाडी हे गाव आहे. या गावच्या हद्दीत ११ जानेवारी २०१६ रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास चादरीत गुंडाळलेला मृतदेह पडला असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा चादर व्यवस्थित रीत्या बांधण्यात आली होती. काही अंतरावर भटकी कुत्री घुटमळत होती. तेथेच एक टॉवेलही पडला होता. शुभ्र टॉवेलवर ‘हॉटेल सरोवर’ अशी अक्षरे होती. पोलिसांनी गुंडाळलेल्या चादरीतून मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, चादरीत आणखी एका ब्लँकेट ठेवण्यात आले होते. ब्लँकेटच्या गाठी देखील व्यवस्थित बांधण्यात आल्या होत्या. पोलिसांनी ब्लँकेटच्या गाठी सोडल्या. तेव्हा कवटी आणि पायाचा भाग सापडला. हा प्रकार बघून पोलिसही क्षणभर हादरले. तेथेच केसांचे तुक डे पडले होते. त्यावरुन पोलिसांनी मृतदेह महिलेचा असल्याचा संशय व्यक्त केला. तातडीने मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. वैद्यकीय तज्ज्ञांकडून अधिकाधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न (मेडिकल क्वेरीज) पोलिसांनी या प्रकरणात केला. मात्र, शवविच्छेदन अहवालातून उलगडा झाला नाही. या गुन्ह्य़ाच्या तपासाबाबतची ही माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शेखर शिंदे यांनी दिली.

हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार होती, हे निश्चित होते. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला या भागात खबऱ्यांकडून माहिती घेण्यास सुरुवात केली. दरीपुलावर थांबलेल्या चारचाकी वाहनांबाबतची माहिती घेण्याचाही प्रयत्न केला गेला. मात्र, खबऱ्यांकडून फारशी माहिती मिळाली नाही. पोलिसांना कोणतेही धागेदोरे मिळत नव्हते. धागेदोरे न मिळाल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळावर सापडलेल्या टॉवेलच्या आधारे तपास सुरू केला. टॉवेलवर अगदी बारीक अक्षरात लिहिलेल्या हॉटेल सरोवरचा पत्ता शोधण्यास सुरुवात झाली. पुणे शहरात असलेल्या सरोवर नावाच्या हॉटेलची माहिती घेण्यास सुरुवात झाली. तेव्हा पिंपरी आणि लोणावळ्यात सरोवर नावाची दोन आणि शिर्डीत तीन अशी महाराष्ट्रात पाच हॉटेल्स असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी तातडीने पिंपरी आणि लोणावळ्यातील हॉटेल्सना भेटी दिली. हॉटेलचे व्यवस्थापक आणि कामगारांना टॉवेल दाखवण्यात आला. तेथील सीसीटीव्ही फुटेज पडताळण्यात आले. पोलिसांनी हॉटेल्समधील चादर, ब्लँकेट आणि टॉवेल्स धुणाऱ्या व्यावसायिकांची माहिती मिळाली. त्यानुसार महिलेचा मृतदेह बाह्य़वळण मार्गाच्या भागात झाला होता. त्यामुळे पोलिसांनी तेथील धोबीघाटांची माहिती घेतली. धायरीतील एका धोबीघाटाला पोलिसांनी भेट दिली. तेथील कामगारांची चौकशी करण्यात आली. त्यातूनही फारशी माहिती उपलब्ध झाली नाही, अशाही माहिती शेखर शिंदे यांनी दिली.

महिलेचा खून ३१ डिसेंबरनंतर म्हणजेच नववर्षांच्या मध्यरात्री झाल्याचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी नववर्षांच्या दिवशी बाह्य़वळण मार्गावरून झालेल्या मोबाइल संभाषणांची पडताळणी करण्यास सुरुवात केली. तांत्रिक तपासात या भागातील एका हॉटेलमधील दोन कामगार नववर्षांच्या रात्रीपासून बेपत्ता झाले होते, असे लक्षात आले. त्यांचे संभाषण सातत्याने सुरू होते. नंतर पोलिसांनी या दोघा कामगारांवर लक्ष केंद्रित केले. ते बिहारचे होते. तपासात ते दोघे फातिमानगर भागातील एका हॉटेलमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली. त्यांना ताब्यात घेण्यात आले. तेव्हा बाह्य़वळण मार्गावरील हॉटेलचे व्यवस्थापन दुसऱ्या एकाकडे सोपवण्यात आले होते. त्यामुळे तेथील नोकरी सोडून पळालो अशी कबुली त्यांनी दिली. उर्वरित मोबाइल संभाषणाची पडताळणी केली असता या भागात मोठय़ा संख्येने राहणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नववर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी परस्परांना संपर्क साधल्याचे निष्पन्न झाले होते. राज्यातून तसेच पुणे, सातारा भागातून बेपत्ता झालेल्या महिलांचाही शोध घेण्यात आला. मात्र, तपासाच्या अनुषंगाने महत्त्वाची काही माहिती मिळाली नाही. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत शिंदे मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून पोलीस शिपाई धनंजय वणवे यांनी गेले वर्षभर तपासासाठी विशेष परिश्रम घेतले, असेही शिंदे यांनी सांगितले. खून झालेली महिला मध्यमवर्गीय कु टुंबातील असावी. कौटुंबिक वाद किंवा अनैतिक संबंधातून तिचा खून झाल्याची शक्यता आहे. गेले वर्षभर दरीपुलावरून टाकून दिलेल्या महिलेच्या खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी अनेक मार्गानी तपास केला. मात्र त्या महिलेची ओळख देखील पटलेली नाही. ओळख पटवण्यासाठी कोणी पुढे देखील आले नाही. कधी तरी खुनाला वाचा फुटेल, मारेकरी पकडला जाईल या विश्वासावर पोलिसांचा तपास सुरू आहे.