शहराचा विस्तार झाला, तशी उपनगरांमध्ये वास्तव्यास गेलेल्या नागरिकांना त्यांचे वास्तव्य असलेल्या भागामध्ये सांस्कृतिक केंद्रांची गरज भासू लागली. हे ध्यानात घेऊन अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या उपाध्ये व्हायोलिनवादन विद्यालयाच्या वतीने सहकारनगर परिसरात छोटेखानी संगीत मैफलींच्या आयोजनासाठी एक नवे सांस्कृतिक केंद्र विकसित करण्यात आले आहे. विद्यालयाचा उदयोन्मुख कलाकार अमन वरखेडकर (व्हायोलिन) आणि धवल जोशी (बासरी) यांच्या कलाविष्काराने ‘मंगलकृष्ण सभागृह’ शनिवारपासून (२७ सप्टेंबर) संगीतप्रेमी रसिकांच्या सेवेत दाखल होत आहे.
एके काळी केवळ पेठांपुरत्या मर्यादित असलेल्या पुण्याचा पानशेत पुरानंतर झपाट्याने विकास झाला. गेल्या अर्धशतकामध्ये विविध उपनगरांमध्ये नागरिक वास्तव्यास गेले आणि शहराचाही विस्तार झाला. उपनगरांमधील नागरिकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी महापालिकेने जाणीवपूर्वक पावले उचलली. एके काळी दिवसा पर्वतीवर जाण्याची धास्ती वाटणाऱ्या पुणेकरांनी अगदी कात्रजपर्यंत घर घेण्याची मजल मारली आहे.
सातारा रस्त्यावर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह असले, तरी ते केवळ नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीच उपयोगात येते. मुक्तांगण बालरंजन केंद्र येथेही सांस्कृतिक कार्यक्रम होतात. पण, छोटेखानी संगीत मैफिलींसाठी व्यासपीठ नसल्याची उणीव उपाध्ये व्हायोलिनवादन विद्यालयाने भरून काढली आहे.
‘सहकारनगर परिसरातील उमाशंकर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या विद्यालयाच्या सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले. पूर्वी विद्यार्थ्यांना शिकविण्याची जागा असलेले हे सभागृह नूतनीकरणानंतर तिप्पट मोठे झाले आहे. त्याचे ‘मंगलकृष्ण सभागृह’ असे नामकरण करण्यात आले असून, शनिवारपासून ते रसिकांना आनंद देण्याच्या सेवेत रुजू होईल,’ अशी माहिती विद्यालयाचे प्रमुख आणि प्रसिद्ध व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांनी दिली. या सभागृहामध्ये अत्याधुनिक ध्वनियंत्रणा, ऑडियो-व्हिडिओ लायब्ररी, तसेच ध्वनिमुद्रणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या मैफिली करणे सोपे राहिले नाही. सभागृहाचे आणि ध्वनियंत्रणेचा खर्च मोठा असतो. हे ध्यानात घेऊन येथे छोटेखानी मैफली होतील आणि युवा कलाकारांना कलाविष्काराची संधी मिळेल, की ज्यायोगे त्याचा संगीत क्षेत्रात फायदा होईल, याकडे उपाध्ये यांनी लक्ष वेधले.vidyadhar.kulkarni@expressindia.com