वापरा आणि फेकून द्या हेच भाजपाचे धोरण असल्याची टीका माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. आज लालकृष्ण अडवणींचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करतानाच ओबीसींच्या नेत्यांचा मतांसाठी वापर करण्यात आल्याचा आरोप खडसेंनी भाजपावर केलाय. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी ओबीसींसाठी न्याय मागितला. ४० वर्ष ओबीसींसाठी संघर्ष केला मात्र भाजपाचे धोरण हे वापरा आणि फेकून द्या असेच असल्याचं खडसे म्हणाले आहेत. ते गुरुवारी पिंपरी-चिंचवडमध्ये खासगी कार्यक्रमात बोलत होते.
“मी मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचलो. हा आपल्या स्पर्धेमध्ये असता कामा नये. म्हणून बाजूला करण्यात आलं,” असं खडसे यांनी फडणवीस यांचं थेट नाव न घेता म्हटलं आहे. “गेल्या ७० वर्षाच्या राजकीय जीवनात खान्देशचा मुख्यमंत्री झाला नाही. खान्देशवाशीयांना असं वाटतं की, मराठवाडयाचे दोन- तीन मुख्यमंत्री झाले, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई येथील मुख्यमंत्री झाले. पण खान्देशमधील झाले नाहीत. अन् एखादा माणूस पोहचला तर त्याला होऊ दिले नाही,” अशी खंत खडसेंनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
“वापरा आणि फेकून द्या हेच भाजपाचे धोरण आहे. भाजपासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी उभं आयुष्य घातलं. पण ते आज कुठे आहेत?”, असा प्रश्न खडसेंनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले की, “स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासह एकनाथ खडसे अशा अनेक नेत्यांनी ओबीसींसाठी न्याय मागितला. ४० वर्षे ओबीसींसाठी संघर्ष केला. परंतु, भाजपाने मतांसाठी ओबीसी नेत्यांचा वापर केला. आज ते नेते कुठे आहेत? अशा अनेक कारणांसाठी पक्ष सोडून राष्ट्रवादीत यावं लागलं.”
पिंपरी-चिंचवड पालिकेतील भ्रष्टाचार कोणाच्या आशीर्वादाने?
“पिंपरी महानगरपालिकेमधील स्थायी समितीचा अध्यक्ष लाच घेतो. कोणाच्या आदेशाने घेत होता. वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याशिवाय हिंम्मत होणार नाही. माजी उपमहापौरांनी खंडणी घेतली म्हणून ते आत आहेत. अनेकांना अजून जेलमध्ये जायचं आहे. येऊ द्या आमचं सरकार! मग बघा कसे एक- एक आत जातात ते,” असा सूचक इशारा खडसे यांनी दिलाय.
“देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी महानगर पालिकेत झालेला भ्रष्टाचार हा विधानसभेत मांडावा. आपल्या माणसाची चौकशी मागणी करत नाहीत. पण, इतरांकडे ते बोट दाखवतात. हे योग्य नाही. भ्रष्ट्राचारविरोधात भांडायचे असेल तर आपला असो वा परका जे घडलेलं आहे त्याच्या विरोधात चौकशी, कारण्याची मागणी केली पाहिजे,” असंही खडसे म्हणाले.