scorecardresearch

पुणे : माध्यमांचा वापर सकारात्मक आणि विधायक ; हवा – निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांचे मत

पूर्वी बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली असे म्हटले जाई, आता उपलब्ध तंत्रज्ञान बघता बातमी पसरण्याचा वेग प्रकाशाच्या वेगाशी स्पर्धा करणारा आहे.

पुणे : माध्यमांचा वापर सकारात्मक आणि विधायक ; हवा – निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांचे मत
मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर

पूर्वी बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली असे म्हटले जाई, आता उपलब्ध तंत्रज्ञान बघता बातमी पसरण्याचा वेग प्रकाशाच्या वेगाशी स्पर्धा करणारा आहे. माध्यमाची ही ताकद लक्षात घेऊन तिचा सकारात्मक आणि विधायक वापर करणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी शनिवारी व्यक्त केले.

हेही वाचा – पुणे : तणावमुक्त होण्यासाठी पुणेकरांची पसंती ‘ड्रम’ वादनाला

पुणे बार असोसिएशन आयोजित ‘ज्युडिशियल कोलोकिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मृदुला भाटकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे उपस्थित होते. मृदुला भाटकर म्हणाल्या, वकील आणि न्यायाधीश यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांनी मार्गदर्शन करावे, अशी समाजाची अपेक्षा आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आपण ओळखण्याची गरज आहे. न्याय आणि विधी क्षेत्रातील व्यक्ती समाज माध्यमांचा वापर मते आणि भावना मांडण्यासाठी करताना दिसतात. मात्र, त्यांनी तसे करणे अपेक्षित नाही.

समाज माध्यमे तुमची जाहिरात करण्यासाठी, तुमच्या वैयक्तिक हेवेदाव्यांसाठी नसून समाज प्रबोधनासाठी वापरण्याची गरज आहे. ‘बार’ आणि ‘बेंच’ या प्रवासात तारतम्य ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचेही भाटकर यांनी स्पष्ट केले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या व्यक्तींनी अनन्यसाधारण योगदान दिले त्यांच्यामध्ये महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर जिना, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू या कायदेतज्ज्ञांचा सहभाग मोठा आहे. त्यावरून कायदा आणि न्यायव्यवस्थेचे समाजातील स्थान ओळखणे शक्य आहे. समाज माध्यमांचा वापर करताना परिपक्वपणे विचार करण्याची गरज असल्याचेही भाटकर यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व पुणे न्यूज ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Use media positively and constructively mrudula bhatkar pune print news amy

ताज्या बातम्या