पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्य मंडळ) पुण्यातील मुख्य कार्यालयासह नऊ विभागीय कार्यालयांमध्ये २९७ कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाला मान्यतेसाठी पाठवण्यात आला असून, मंजुरीनंतर पदभरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
राज्य मंडळाच्या मुख्य कार्यालयासह मुंबई, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नाशिक येथे विभागीय मंडळे आहेत. राज्य मंडळाकडून विभागीय मंडळांच्या माध्यमातून प्रामुख्याने दहावी-बारावीच्या परीक्षा आयोजित केल्या जातात. राज्य मंडळ ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे मंडळाकडे जमा होणाऱ्या महसुलातून भरती, वेतन आदी प्रक्रिया राबवण्यात येते.
२०१९ मध्ये राज्य मंडळासह नऊ विभागीय कार्यालयांमध्ये २६६ कनिष्ठ लिपिकांची पदे भरण्यात आली. मात्र, गेल्या सहा वर्षांत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आहे. या पार्श्वभूमीवर, दहावी-बारावीच्या परीक्षा, अन्य कामे सुरळीत पार पाडण्यासाठी २९७ पदांवर पदभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य मंडळ स्वायत्त असले, तरी भरती प्रक्रियेसाठी प्रशासकीय मान्यता आवश्यक असते. त्यामुळे प्रस्तावित भरती प्रक्रियेचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यावर नवीन कर्मचाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. राज्यात शासकीय पदभरतीच्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य मंडळातील प्रस्तावित भरतीमुळे एक संधी निर्माण होणार आहे. मात्र, पदभरती प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतरच पदभरतीसाठीच्या परीक्षेबाबतचा पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुख्य कार्यालयासह नऊ विभागीय कार्यालयांमध्ये विविध पदे रिक्त आहेत. त्यातीलच लिपिकांची २८६ पदे, तर तांत्रिक ११ पदे अशी एकूण २९७ पदांवर भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीच्या प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबवण्यात येईल.’