पिंपरी : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी वैष्णवीचा पती शशांक आणि सासू लता या दोघांविरुद्ध जेसीबी मशीनच्या व्यवहारात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयीन कोठडीतून मंगळवारी या दोघांना ताब्यात घेतले. खेड, राजगुरूनगर न्यायालयात हजर करण्यात आले असता दोघांनाही तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
प्रशांत अविनाश येळवंडे (वय ३३, रा. निघोजे, ता. खेड) यांनी २९ मे रोजी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, शशांक राजेंद्र हगवणे आणि लता राजेंद्र हगवणे (दोघे रा. भुकूम, ता. मुळशी) यांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लता हगवणे हिच्या नावावर असलेले जेसीबी मशीन प्रशांत यांनी खरेदी करण्याचा व्यवहार ठरला. जेसीबीच्या बँक कर्जाच्या हप्त्याची दरमहा ५० हजारांची रक्कम प्रशांत हे शशांकला देत होते. मात्र, शशांकने हप्ते भरले नाहीत. प्रशांत हे संबंधित रक्कम किंवा मशीनची मागणी करण्यासाठी गेले. त्यावेळी शशांकने पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यात येळवंडे यांना ११ लाख ७० हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेल्या शशांक व लता यांना म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी येरवडा कारागृहातून मंगळवारी ताब्यात घेतले. राजगुरूनगर न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले असता दोघांनाही सहा जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी दिली.