पिंपरी : ‘हगवणे कुटुंबीय आणि नीलेश चव्हाण या सर्वांनी मिळून वैष्णवी हगवणे यांचा खून केला आहे. हगवणे कुटुंबीयांनी वेळोवेळी कस्पटे यांना धमक्या दिल्या आहेत. त्यावरून हा संघटितपणे केलेला खूनच आहे. या लोकांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करावी,’ अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

वाकड येथे वैष्णवीच्या कुटुंबीयांची सोमवारी भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले, ‘सून ही मुलीसारखीच असते. वैष्णवीला नांदवायचे नव्हते तर तिला माहेरी पाठवायचे होते. मात्र, अशा एका सालस, गुणवान मुलीचा हगवणे कुटुंबाने जीव घेतला. दोन वर्षे वैष्णवीचा छळ केला. हे लाजिरवाणे, हृदय पिळवटून टाकणारे कृत्य सासरच्यांनी केले आहे. हे प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही. राजकीय दबावाखाली पोलीस कारवाई करायला धजावले नसतील. आरोपी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षांशी संबंधित आहेत. चव्हाण याने बाळ घ्यायला गेलेल्या कस्पटे कुटुंबाला पिस्तूल दाखवले. हे सर्व पाहिल्यास या लोकांना वैष्णवीचा खूनच करायचा होता. हे स्पष्ट होते.’

‘या खटल्यासाठी कुटुंब ज्या वकिलाची मागणी करेल, तोच वकील नियुक्त केला पाहिजे. हा खटला द्रुतगती न्यायालयात चालवला पाहिजे. हगवणे कुटुंबाला फासावर लटकेपर्यंत पाठपुरावा केला जाईल,’ असेही दानवे म्हणाले.

दरम्यान, बीडमधील मस्साजोग येथील दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही वैष्णवी हगवणे हिच्या कुटुंबीयांची सोमवारी भेट घेतली आणि सांत्वन केले. घरी बसून न्याय मिळत नाही. न्याय मिळवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरून उपोषण, आंदोलन करावे लागेल असे देशमुख म्हणाले.

राज्य महिला आयोगाला कोणी विचारत नाही

‘नोटीस देण्यापुरता आणि घेण्यापुरता राज्य महिला आयोग आहे. राज्य महिला आयोगाने एखाद्या अन्यायग्रस्त महिलेला न्याय दिला आहे, हे दाखवून द्यावे. आयोग फक्त अन्यायग्रस्तांची सुनावणी घेते. त्या आयोगाला कोणताही अधिकार नाही. एखादी घटना घडल्यावर भेट देणे एवढेच महिला आयोगाचे काम आहे. पोलिसांनीच योग्य भूमिका पार पाडावी,’ असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैष्णवीची आत्महत्या नसून हत्या आहे. हगवणे कुटुंबाने वैष्णवीला मारण्याचा सामूहिक कट रचला. पोलिसांनी तपासाची सर्व माहिती कस्पटे कुटुंबाला द्यावी. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई सुरू करावी. सरकारने कुटुंबाशी चर्चा करावी. त्यानुसार तपास करावा-मनोज जरांगे-पाटील, मराठा आंदोलनाचे नेते