Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण राज्यभरात चर्चेत आलं आहे. या प्रकरणी हगवणे कुटुंबावर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी होते आहे. तर वैष्णवीच्या आई वडिलांनी हगवणे कुटुंबावर मकोका लावावा अशी मागणी केली आहे. पोलिसांनी वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचा नवरा शशांक हगवणे, नणंद करीश्मा हगवणे आणि सासू लता यांना तातडीने अटक केली. तर आठ दिवसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक केली. हे दोघं फरार झाले होते. दरम्यान आता सुशील हगवणेची एक पोस्ट चर्चेत आली आहे ज्यावर नेटकरी चांगलेच संतापले आहेत.

वैष्णवीच्या आत्महत्येनंतर राजेंद्र आणि सुशील हगवणेंची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून त्याबाबतची नोटीस काढण्यात आली होती. राजेंद्र हगवणेकडं पुण्यातलं मुळशी तालुक्यातचं अध्यक्षपद होतं. तर लेक सुशील हगवणे युवक काँग्रेसचा पदाधिकारी होता. या घटनेनंतर नागरिक संताप व्यक्त करत आहेत, दरम्यान, सुशील हगवणेची एक सोशल मिडिया पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली आहे, त्याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लेक आणि सुनेबाबत लिहलं आहे. सुशीलच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत आपला राग व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुनेत्रा पवारांचा प्रचार

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत असताना सुशील हगवणे याने मागच्या वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांचा प्रचार केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढवली होती. बारामतीत नणंद विरूध्द भावजय अशी लढत झाली होती. त्यावेळी सुशील हगवणे हा सुनेत्रा पवारांचा प्रचार करत होता. त्यावेळी त्यानं सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी इन्स्टाग्रामवरती पोस्ट केली होती. ‘यावेळी लेकीला नाही तर सुनेला निवडून आणुया….सूना घराबाहेर पडल्या तर स्वतःचं साम्राज्य पण उभारू शकतात, सूना सुद्धा इतिहास घडवू शकतात हे जगाला दाखवून देऊया…. एक मत सुनेसाठी,’ अशी पोस्ट सुशील हगवणे याने केली होती.

Vaishnavi Hagawane Case Karishma Hagawane
Vaishnavi Hagawane Death Case News: पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी शशांक हगवणे आत्महत्याप्रकरणी महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेटकऱ्यांनी काय म्हटलं आहे?

सुनेसाठी मतदान करण्याबाबत आवाहन करणाऱ्या सुशील हगवणेच्या घरातील व्यक्तींनी दोन्ही सुनांना छळलं. दोघीनांही प्रचंड त्रास दिला. त्याच त्रासातून एकीनं घर सोडलं तर दुसरीनं टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं. त्यामुळे वर्षभरापुर्वीची सुशील हगवणेची पोस्ट सध्या चर्चेत आली असून नेटकऱ्यांनी कमेंट करत रोष व्यक्त केला आहे. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण’ अशी हगवणे कुटुंबाची अवस्था असल्याच्या कमेंट सुशीलच्या पोस्टखाली दिसून येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५५ आठवड्यांपूर्वीच्या पोस्टवर प्रतिक्रिया

विशेष म्हणजे सुशील हगवणेची ही पोस्ट ३ मे २०२४ आहे. मात्र, त्याखाली आलेल्या बहुतांश कमेंट या गेल्या काही तासांपूर्वीच्या किंवा आठवड्याभरात करण्यात आलेल्या आहेत. सुशील हगवणेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुनेत्रा पवार आणि रुपाली ठोंबरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. त्यावरुन अनेकांनी नेत्यांवरतीही हल्लाबोल केला आहे. तुमचे कार्यकर्ते काय प्रकार करतात ते बघा, काल चॅनेलवर चर्चेत तुम्ही म्हणाला होतात की मला माहीत नव्हतं ते आमच्या पक्षात आहेत ते. मग हे काय आहे?, असे प्रश्न ठोंबरेंना विचारण्यात आले आहेत.