Vaishnavi Hagawane Case Breaking Updates: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे पदाधिकारी राहिलेले राजेंद्र हगवणे, त्यांचा धाकटा मुलगा शशांक हगवणे, त्याची बहीण व आई यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली असून हे कुटुंब सध्या फरार आहे. सासरकडच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणेनं आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली असून त्यानुसार पोलीस तपास करत आहेत. त्यातच आता वैष्णवीची मोठी जाऊ अर्थात हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी हगवणे हिनेदेखील धक्कादायक आरोप केले आहेत.

वैष्णवी हगवणे हिची मोठी जाऊ अर्थात शशांक हगवणेचा मोठा भाऊ सुशील हगवणेची पत्नी मयुरी हिने टीव्ही ९ शी बोलताना वैष्णवी आत्महत्या प्रकरणाबाबत बोलताना अनेक धक्कादायक दावे केले आहेत. त्यात वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे, त्याचे आई-वडील व नणंद हे सगळे पती सुशील व आपल्याला मारहाण करायचे, असा आरोप मयुरीने केला आहे. या मारहाणीमुळे झालेल्या जखमांचे फोटोही मयुरीने दाखवल्यामुळे या प्रकरणात हगवणे कुटुंबाविरोधात संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.

“माझ्या सासऱ्यांनीही माझ्यावर हात उचलला”

सासरे राजेंद्र हगवणे यांनीही आपल्यावर हात उचलल्याचा आरोप मयुरी हगवणेनं केला आहे. “२०२२ ला माझं सुशील हगवणे यांच्यासोबत लग्न झालं होतं. पण माझी नणंद, दीर आणि सासू यांनी माझा कायम छळ केला. सासूनं माझे कधी लाड केले तर नणंद त्यांना त्रास द्यायची. माझे पती माझ्या पाठिशी होते. पण हगवणे कुटुंबीयांनी माझ्या पतीलादेखील मारहाण केली आहे. त्यांनी त्यांच्या मुलालाही सोडलं नाही. माझी नणंद व दीरानं माझ्या चारित्र्यावर संशय घेतला. माझ्या सासऱ्यांनी माझ्यावर हात उचलला आहे. आम्ही वेगळं राहायचा प्रयत्न केला, पण तेही त्यांनी होऊ दिलं नाही”, अशा व्यथा मयुरीनं मांडल्या आहेत.

सासरच्या जाचाला कंटाळून मयूरी माहेरी

दरम्यान, हगवणे कुटुंबीयांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून मयुरी हगवणेने माहेरीच राहात असल्याचं सांगितलं. शिवाय पती सुशीलनंच आपल्याला माहेरी आणून सोडल्याचंही ती म्हणाली. “५ नोव्हेंबरला मी सासू, सासरे, दीर व नणंद यांची पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर ते फरार झाले. त्यांनी कधीच मला वैष्णवीशी बोलू दिलं नाही. तिला माझ्याशी बोलू दिलं नाही. वैष्णवी तिचे दीर, सासऱ्यांकडे बघते अशा प्रकारे तिच्या चारित्र्यावर सासरकडच्यांनी शिंतोडे उडवले आहेत”, असा खुलासा मयुरीनं केला आहे.

निलेश चव्हाण कोण?

दरम्यान, वैष्णवीच्या बाळाच्या बाबतीत वारंवार वादात आलेलं नाव म्हणजे निलेश चव्हाण याचाही उल्लेख मयुरीनं केला. “निलेश चव्हाण कायम आमच्या घरातल्या वादात पडलेला आहे. तो शशांक हगवणेचा मित्र नसून करिश्मा हगवणेचा मित्र आहे. माझं नवीन लग्न झाल्यानंतर आमच्या काही बैठका त्याच्या कार्यालयात झाल्या आहेत. माझी नणंद आणि सासू त्याच्या ऑफिसमध्ये या बैठका घ्यायच्या”, असा आरोप मयुरीनं केला आहे.

शशांकची मयुरी व तिच्या पतीला मारहाण

“त्यांनी स्वत:च्या मुलालाच एवढा त्रास दिला होता, तिथे वैष्णवी काय किंवा मयुरी काय त्यांचा ते कधीच विचार करणार नाहीत एवढी त्यांची क्रूर वृत्ती आहे. माझा नवरा माझी बाजू घ्यायचा तर शशांक रुममध्ये येऊन आम्हाला दोघांना मारायचा. माझ्याकडे फोटो आहेत की त्यांनी मला मारलेलं आहे आणि जखमेतून रक्त येतंय”, असं मयुरी म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ते माझ्या पतीला सांगायचे की तू मयुरीला सोडून दे, आम्ही तुझं दुसरं लग्न लावून देऊ. पण माझे पती माझ्या बाजूने कायम उभे राहायचे. ते माझ्यासमोर ढसाढसा रडायचे. मी त्या घरात एका रुममध्ये दीड वर्षं काढलं आहे. माझी गॅस शेगडी, भांडी असं सगळं तिथे असेल. तिथेही त्यांनी मला त्रास दिलाय. लाईट काप, पाणी बंद कर, घरकामाला कुठली बाई येऊ न देणं असं करायचे. कुणालाच माझ्याशी बोलू द्यायचे नाहीत. कुणी बोललं तर त्यांच्याशी सासू आणि नणंद जाऊन भांडायचे. माझे पती त्यावर त्यांना बोलायचे तर ते त्यांनाही मारायचे”, असा आरोपही मयुरीनं केला आहे. “मला दोन महिन्यांपूर्वी कळलं होत की वैष्णवीला खूप मारहाण झाली आहे, तिच्यावर माझी नणंद थुंकली वगैरे”, असाही आरोप मयुरीनं केला आहे.