Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे या विवाहितेने १६ मे रोजी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. हुंड्यासाठी होणारा प्रचंड शारिरीक आणि मानसिक छळ सहन न झाल्याने तिने हे टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणाची पोलीस आता कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणी तिचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करीश्मा यांना आधीच अटक करण्यात आली होती. वैष्णवी हगवणेचा दीर सुशील आणि सासरे राजेंद्र हगवणे फरार झाले होते त्यांना या प्रकरणानंतर आठ दिवसांनी अटक करण्यात आली. या प्रकरणात करीश्माचा मित्र निलेश चव्हाणही सहभागी होता. त्यालाही पोलिसांनी ३० मे च्या दिवशी नेपाळहून अटक केली. आता बंदुकीचा धाक दाखवून वैष्णवीला धमकावण्यात आलं होतं का? याचा तपास पोलीस करत आहेत.
निलेश चव्हाणला शुक्रवारी अटक
पोलिसांनी निलेश चव्हाणला शुक्रवारी या प्रकरणात अटक केली आहे. निलेश चव्हाण वैष्णवीच्या १० महिन्यांच्या बाळासह क्रूरपणे वागला असा आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांनी तपास मोहीम राबवत फरार झालेल्या निलेश चव्हाणला नेपाळहून अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलिसांनी न्यायालयाला हे सांगितलं की निलेश चव्हाणकडे एक बंदुक आहे. या बंदुकीचा परवानाही त्याच्याकडे आहे. वैष्णवीला बंदुकीचा धाक दाखवून निलेश चव्हाणने धमकावलं होतं का? याचा तपास आता पोलीस करु इच्छितात असं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं.
निलेश चव्हाण विरोधात आधीही छळ केल्याचे गुन्हे दाखल
एवढंच नाही तर आम्हाला निलेश चव्हाण आणि शशांक हगवणे (वैष्णवीचा पती) यांचे आर्थिक व्यवहार काय होते? तसंच सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे यांच्याशीही तो आर्थिक व्यवहार करत होता ? हे सगळे पैलू तपासायचे आहेत. वारजे येथील पोलीस ठाण्यात २०२२ मध्ये निलेश चव्हाणच्या विरोधात कलम ३९२, ३२३, ५०६ आणि ३४ या कलमांन्वये गुन्हा दाखल असल्याची बाबही पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकरणानंतर तो चार महिने फरार होता आणि त्याच्या पत्नीनेच ही तक्रार त्याच्याविरोधात केली होती असंही पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. महिलांना वारंवार धमक्या देऊन त्यांचा छळ करण्यासाठी निलेश चव्हाण कुप्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्याने आणखी किती महिलांना छळलं आहे? याचाही तपास आम्हाला करायचा आहे असं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं.

निलेश चव्हाण आणि शशांक हगवणे यांचे फोन रेकॉर्डही तपासणार
निलेश चव्हाण आणि शशांक हगवणे यांच्यात फोनवरुन काय चर्चा झाली होती? हे जाणून घेण्यासाठी पोलीस या दोघांचे फोन रेकॉर्डही तपासणार आहेत. न्यायालयाने या प्रकरणात निलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश चव्हाण हा करीश्माचा जवळचा मित्र आहे. त्याने वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या १० महिन्यांच्या बाळाचा बेकायदेशीररित्या ताबा घेतला होता. एवढंच नाही तर २२ मे रोजी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी निलेश चव्हाणच्या विरोधात एक FIR नोंदवली आहे. वैष्णवीला आणि आम्हाला निलेश चव्हाण धमक्या देत होता असं पोलिसांनी म्हटलं आहे. याच बरोबर पोलीस आता निलेश चव्हाण, शशांक हगवणे, राजेंद्र हगवणे यांच्याकडे असलेल्या बंदुकांचा परवाना रद्द करण्याच्या प्रक्रियाही राबवत आहेत. पोलिसांनी शनिवारी सुशील आणि राजेंद्र हगवणे या दोघांनाही न्यायालयासमोर हजर केलं होतं. या दोघांचीही कोठडी ३ जून पर्यंत वाढवण्यात आली आहे.
वैष्णवीची सुसाईड नोट तिच्या मृतदेहाजवळ मिळाली नाही-पोलीस
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिची सुसाईड नोट तिच्या मृतदेहाजवळ मिळाली नाही. वैष्णवीच्या वडिलांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली. त्यांनी असं म्हटलं आहे की वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नाच्या वेळी ५१ तोळे सोनं, चांदी, ५० लाखांची फॉर्च्युनर या सगळ्या गोष्टी त्यांनी हगवणे कुटुंबाला हुंडा म्हणून दिल्या होत्या. हुंड्याची मागणी त्यांच्याकडून सक्तीने करण्यात आली होती. लग्नाचा खर्च जवळपास १ कोटींपर्यंत करण्यात आला होता. या सगळ्या गोष्टी घडूनही हगवणे कुटुंबाने वैष्णवीचा मानसिक आणि शारिरीक छळ केला. तुझ्या वडिलांकडून दोन कोटी रुपये घेऊन ये असा तगादा तिच्या मागे लावण्यात आला होता. त्यासाठी तिचा छळ केला जात होता असा आरोप अनिल कस्पटेंनी केला आहे. माझ्या मुलीच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या, मला संशय आहे की तिची हत्या करण्यात आली असावी असंही तिचे वडील अनिल कस्पटेंनी म्हटलं आहे.