पुणे : देशात सर्वसमावेशक नेतृत्व नाही. जे नेतृत्व आहे ते पक्षीय आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता टीका केली. राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा उपस्थित करण्याऐवजी सायंकाळी सहानंतर झालेल्या मतदानाचा मुद्दा हाती घेणे आवश्यक होते. ते चुकीच्या व्यवस्थेविरोधात लढत आहेत, अशी टीप्पणी त्यांनी केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी मंगळवारी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी ही टीका केली. पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील आणि सरचिटणीस मंगेश फल्ले यावेळी उपस्थित होते.

मंत्रिमंडळातील मंत्र्याला राज्यघटनेतील तरतुदीनुसार काढता येते. मात्र, त्यानंतरही पुन्हा ३० दिवसांच्या मुदतीचे घटनादुरुस्तीचे विधेयक आणण्यात आले आहे. त्याची आवश्यकता काय, असा सवाल करत आंबेडकर म्हणाले, ‘मंत्र्यांना काढण्याची धमक नेत्यांमध्ये राहिलेली नाही. राजकीय नेते पक्ष सांभाळण्याचे काम करत आहेत. राज्या-राज्यात वाद होत आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्यानंतर सर्वसमावेश राजकीय नेतृत्व देशात दिसले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सनानत हिंदुत्ववाद्यांचे पंतप्रधान आहेत,’

‘राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र, त्याऐवजी सायंकाळी सहा नंतर झालेल्या मतदानाचा मुद्दा हाती घेणे आवश्यक होते. सायंकाळी सहानंतर झालेल्या मतदानाची कोणतीही माहिती नाही. त्याबाबतचे चित्रीकरणही उपलब्ध नाही, असे भारतीय निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून सायंकाळी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याविरोधात लढा देण्याऐवजी चुकीच्या व्यवस्थेविरोधात राहुल गांधी लढत आहेत,‘ असेही त्यांनी सांगितले.

सत्तेसाठी वीस वर्षांची प्रतिक्षा

आंबेडकरी चळवळीतील नेते एकत्र आहेत. मात्र ते वीस वर्षे सत्ताधारी होऊ शकणार नाहीत. समाजातील एक वर्ग वंचितांना कधीच मतदान करणार नाही. हा वर्ग तीस टक्के आहे. वंचित समाजाचा प्रतिनिधी निवडून आला तर स्पर्धक वाढले, हे त्यामागील कारण आहे. ही परिस्थिती बदण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र त्याला अजून अवधी लागणार आहे. त्यामुळे पुढील वीस वर्षे सत्ता लांब असेल, असा दावाही प्रकाश आंबडेकर यांनी केला.

मनोज जरांगे यांच्यावर टीका

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले,‘जरांगे हे रयतेतील मराठ्यांसाठी लढत असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात त्यांचे राजकारण निजमाताली मराठ्यांसाठी चालले आहे. रयतेतील गरीब मराठ्यांसाठी लढा उभारण्याची संधी त्यांना गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळाली होती. मात्र त्यांनी ती गमाविली. स्वत:चे राजकीय अस्तित्व आणि वर्चस्व निर्माण करून त्यांना आरक्षण मिळविता आले असते. लोकांच्या उत्साहाला जोर देण्याएवेजी ते पुन्हा लढ्याची भाषा करत आहेत.’