श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com

शरीरासाठी व्यायाम, डाएट करतानाही मनाची ताकदच महत्त्वाची असते. समोर चांगलेचुंगले पदार्थ आल्यानंतर, शरीरासाठी डाएट करतानादेखील मनाची ताकदच महत्त्वाची ठरते. शरीरासाठी व्यायाम करण्याची ऊर्मी आणि व्यायामाला न जाण्यासाठीची कारणदेखील हे मनच निर्माण करते. मनाने सुयोग्य वाटेवर वाटचाल करावी, मनाला शिस्त लागावी यासाठी ‘माईंड जिम’ च्या माध्यमातून  विविध उपक्रम राबविले जात आहेत.

‘मन’ हा शब्द उच्चारताच कळत नकळत मनामध्ये नानाविध तरंग उमटू लागतात. हे मन आपल्याला एकाच जागेवर बसूनदेखील अगदी सहजतेने विविध प्रकारच्या प्रवासाला घेऊन जाऊ शकते. त्या मनाला ज्या गोष्टी पटतात, ते अगदी सहजतेने करते. एखादी गोष्ट अंगवळणी पडली की, ती सोडून दुसरी काही करायची म्हणल्यास आपले मन तयार होत नाही. रोजच्या ठरलेल्या वाटेवरून शाळा, महाविद्यालय, ऑफीसला जाण्या-येण्याचा रस्ता कितीही अडचणीचा असला तरी तो बदलायला हे मन तयार होत नाही. त्यात प्रत्येकाच्या मनाची जडणघडण वेगवेगळी. त्यामुळे अनेकदा संवादापेक्षा विसंवादाचेच प्रसंग येतात. तुमच्या आमच्या शरीरावर जर कोणी अधिराज्य गाजवत असेल तर ते म्हणजे मन. पण या मनाच्या अधिराज्याला मोडित काढायचे असेल आणि निकोप दृष्टिकोनाची क्षमता विकसित करायची असेल तर तेथे ‘माईंड जिम’ सहाय्यभूत ठरते.

खादाड माणसाचे मन जसे खाण्याकडे ओढ घेते, तसेच ज्याच्या त्याच्या आवडीनुसार मन अगदी सहजतेने तिकडे धावायला लागते. ज्याला प्रवासाची आवड आहे, तो कोणताही विचार न करता आपल्या शरीरासह आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मनासह प्रवासाला निघतो. शालेय शिक्षण संपवून नोकरी, व्यवसायाला सुरुवात करताना अनेकांचे धाबे दणाणतात. काही वेळा केवळ उदरनिर्वाहासाठी काम करणे आवश्यक असतानाच कंटाळारुपी राक्षस तुमच्या कामावर आणि पर्यायाने तुमच्या ‘परफॉर्मन्स’वरही परिणाम करू लागतो. या आणि अशा प्रकारच्या अनेक तक्रारी दूर करण्यासाठीचे उत्तर केवळ आणि केवळ आपले मनच देऊ शकते. यासाठी गरज आहे ती मनाकडे त्रयस्थपणे पाहण्याची, वर्तमानात जगण्याची सवय लावून घेत असतानाच भविष्याची चिंता दूर सारत निकोप, अर्थपूर्ण, सृजनशील आयुष्याच्या वाटचालीसाठी दिशा देणे हा ‘माईंड जिम’ चा प्रमुख उद्देश आहे.

स्वत:विषयी जाणीव असणे, स्वत:च्या मर्यादा लक्षात घेणे, स्वत:च्या क्षमता ओळखून राहाणे, अधिकची अस्वस्थता येऊ न देणे याबरोबरच एकटेपणा आनंदात घालवता येणे आणि कोणताही प्रसंग योग्य पद्धतीने हाताळता येणे हे निकोप आणि प्रगल्भ मनाचे लक्षण आहे. या मानसिकतकडे नेण्यास ‘माईंड जिम’ सहाय्यभूत ठरते. कुठले दृष्टिकोन वाजवी आणि अवाजवी? स्वसंवाद कसा ओळखायचा? रागावर नियंत्रण कसे आणायचे? सहानुभुतीने केलेला संवाद कसा दिसतो? नातेसंबंधात किती ‘स्पेस’ असावी? संवाद कौशल्य कसे आत्मसात करावे? या सगळ्यांची उत्तरे या मनाच्या व्यायामशाळेत मिळतात.

व्यायाम हा शरीराबरोबरच मनासाठीदेखील तेवढाच महत्त्वाचा असते हे या मनाच्या व्यायामशाळेने विविध प्रकारच्या प्रयोगांमधून मागील वर्षभरात दाखवून दिले. कालच्या पिढीने व्यायामशाळेकडे कधीतरी धाव घेतली असली तरी आजची आणि उद्याची पिढी व्यायामशाळेकडे वळणे तसे थोडे अवघडच म्हणूनच मनासाठीची ‘जिम’ वर्षांभरापूर्वी म्हणजे ४ जुलै २०१८ या दिवशी सुरू झाली. विविध प्रयोगांद्वारे मनाला उदात्ततेच्या वाटेकडे नेणारी ही जिम वैविध्यपूर्ण कलाप्रकार हाताळत मनाला आकार देण्याचा आगळावेगळा प्रयत्न करते. विविध प्रयोगांच्या धर्तीवर  केल्या जाणाऱ्या उपचारपद्धती (थेरपी) या व्यायामशाळेत येणाऱ्यांना सुरुवातीच्या काळात थोडय़ा अवघड वाटल्या. पण त्या उपचारपद्धतींकडे निकोपतेने पाहिल्यानंतर अनेकांना आपल्या जीवनातील साचलेपण कमी होऊन मोकळेपणाची भावना निर्माण झाली. मनाकडे पाहण्याची, मन म्हणजे काय? याचा विचार करण्याबरोबरच विचार, भावना, वर्तन या मुद्दय़ांवर प्रामाणिकपणे काम केल्यानंतर त्यांच्या वैचारिक कक्षा रुंदावण्यास सुरुवात झाली. कोणतीही गोष्ट करण्यास सांगितल्यावर सुरुवातीस असलेली ‘अरे बापरे’ ही प्रतिक्रिया जाऊन निर्मितीचा आनंद केवळ त्यांच्या चेहऱ्यावरच झळकू लागला नाही, तर तो देहबोलीतूनही जाणवू लागला.

‘माईंड जिम’ मध्ये स्व-नियंत्रण, स्व-दिशा, भावनिक साक्षरता, समता, सहिष्णुता आदींचाही समावेश वेळोवेळी केला जातो आणि हे सर्व कार्य कोणत्याही आर्थिक व्यवहारांशिवाय चालते. दर शनिवारी सायंकाळी साडेचार ते साडेसहा या वेळेत छत्रे सभागृह, कर्नाटक हायस्कूल गेट क्रमांक दोन समोर, एरंडवणे येथे चालते. अनुराधा करकरे यांनी सुरु केलेल्या या व्यायामशाळेच्या अधिक माहितीसाठी किंवा या व्यायामशाळेत जाण्यासाठी ९९६०४४२७३४ या क्रमांकावर लीना कुलकर्णी यांच्याशी अथवा ९८८१४९८२४५ या क्रमांकावर वैशाली जोशी यांच्याशी संपर्क साधता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नृत्य, नाटय़, संगीत, चित्र, साहित्य, शब्द खेळ, कविता, व्याख्याने यांचा ‘माईंड जिम’ मध्ये समावेश असतो. सामाजिक विषयांबरोबरच, भावनिक, वैचारिक विषयांवरील व्याखानांचेदेखील येथे आयोजन करण्यात येते. तसेच भावना ताब्यात ठेवता येणे आणि योग्यप्रकारे व्यक्त करता येणे, योग्य कृतीचा पर्याय निवडता येणे हे शिकण्याच्या आणि सरावाच्या गोष्टींवर या जिममध्ये भर दिला जातो. तरुणाईच्या आणि ज्येष्ठांच्या समस्या हाताळण्यासाठी विविध तंत्र हाताळण्याची हातोटी देणाऱ्या या जिममध्ये शिकायला मिळत असल्यामुळे येथे येण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही. अशा या जिमच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त  गुरुवारी (१८ जुलै) सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत बालशिक्षण मंदिर सभागृह येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी लेखिका निलांबरी जोशी डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी संवाद साधतील. स्मरण, नियोजन, निर्णयक्षमता, सतर्कता, समस्या निराकारण या पाच तत्त्वांवर आधारित ‘माईंड जिम’मध्ये केला जाणारा व्यायाम मनाच्या मशागतीमध्ये उपयुक्त ठरेल यात शंका बाळगण्याचे कारण नाही.