मुलाला धमकीची चिठ्ठी मिळाल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरेंनी फेसबुकवरुन पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. राजकारणामध्ये काम करताना कोण कधी वैरी होतो हेच समजत नाही असं भावनिक वक्तव्य करतानाच वसंत मोरेंनी नेमकं काय घडलं आणि ही चिठ्ठी रुपेश मोरेंना कधी सापडली याबद्दलचा तपशील पोस्टमध्ये मांडलाय. त्याचबरोबरच पोस्टच्या शेवटी चिठ्ठी ठेवणारी व्यक्ती सीसीटीव्हीत दिसल्याचे संकेत देत रुपेशला धमकावणाऱ्या या अज्ञात व्यक्तीला वसंत मोरेंनी सूचक शब्दांमध्ये इशारा दिलाय.
नक्की वाचा >> “रात्री पावणे बाराला बस पूर्ण लाईट लावून उभी होती, कंडक्टर गाडीभोवती फिरत होता, संशय आला म्हणून…”; मनसेच्या वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत
“मुलगा म्हटलं की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप म्हटलं की प्रत्येक पोराचा आदर्श असतो. आमचंही अगदी तसंच आहे. पण कोणाला तरी हे का खटकतंय तेच समजत नाही,” अशा भावनिक शब्दांमध्ये मोरे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट लिहिली आहे.
“राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही. गेले दोन तीन दिवस बोलू की नको तेच समजत नव्हतं. पण आज ठरवलं की तुमच्यासोबत बोललंच पाहिजे. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्याची रुपेश आणि त्याच्या मित्र परिवाराने सर्व तयारी केली. त्याची गाडी त्याने शाळेच्या मैदानात लावली होती त्या दरम्यान कोणीतरी त्याच्या गाडीच्या वायपरमध्ये ‘सावध रहा रुपेश’ अशी चिट्ठी लावून ठेवली जी रात्री घरी आल्यावर पाहिली,” असं वसंत मोरेंनी पोस्टमध्ये म्हटलंय.
नक्की वाचा >> “मोदींनी सांगून पण अजित पवारांनी भाषण केलं नाही हा…”; अमोल मिटकरींचा देहूमधील भाषण वादावरुन टोला
“तसा तो कोणाच्या अध्यात मध्यात नसतो तरीही असे का? हाच प्रश्न मनाला चटका लावून जातोय,” असंही मोरे या पोस्टमध्ये म्हणालेत. “आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा त्यांची कामं करायची आणि कोणी तरी आपल्या कुटुंबाबाबतीत असा विचार करायचा? हे का तेच कळत नाही,” अशी खंतही मोरेंनी या पोस्टमधून व्यक्त केलीय.

नक्की वाचा >> “…म्हणून आम्ही त्या महिलेसोबत थांबलो”; वसंत मोरेंनी कौतुक केलेल्या कंडक्टरने सांगितलं नेमकं त्या रात्री काय घडलं
पोस्टच्या शेवटी मोरे यांनी रुपेशला धमकावणाऱ्याला सूचक शब्दामध्ये इशारा दिलाय. भारती विद्यापीठ पोलीस तपास करत आहेत, असं मोरे म्हणालेत. धमकावणाऱ्या व्यक्तीची झलक सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे संकेत मोरेंनी पोस्टमधून देताना, “तू जो कोणी असशील तो पुसट असा कॅमेऱ्यात दिसतोय,” असं म्हटलंय. पुढे याच धमकावणाऱ्याला इशारा देताना मोरेंनी, “बाबा फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत मोरे आहे,” अशा शब्दांमध्ये इशारा दिलाय.

या प्रकरणी वसंत मोरेंनी १३ जून रोजी पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्याविरोधातील भूमिका जाहीर केल्यापासून वसंत मोरे चांगलेच चर्चेत आहेत. राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत नसल्यापासून ते ‘शिवतिर्थ’वर राज यांची घेतलेली भेट, पक्षांतराच्या चर्चा या साऱ्या गोष्टींमुळे मोरे मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत असतानाच आता त्यांच्या मुलाला धमकीची चिठ्ठी मिळाल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत.