पुणे : पद्मावतीतील तळजाई वसाहतीत टोळक्याने दहशत माजवून चार वाहनांची तोडफोड केली. टोळक्याने शस्त्रे उगारून नागरिकांना शिवीगाळ केली. याप्रकरणी अल्पवयीनांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी आशुतोष देडे (वय २०), ओम थोरात (वय २०) यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केलेल्या आरोपींमध्ये अल्पवयीनांचा समावेश आहे. याबाबत दीपक कुचेकर (वय ४३, रा. महात्मा गांधी वसाहत, तळजाई वसाहत, पद्मावती) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देडे, थोरात आणि साथीदार हे तळजाई वसाहतीत राहायला आहेत. सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास आरोपी आरडाओरडा करत वसाहतीत शिरले. ‘आम्ही तळजाई वसाहतीतील भाई आहोत. आमच्या नादाला लागला तर जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी देऊन वसाहतीत दहशत माजविली. रहिवाशांना शिवीगाळ करून त्यांनी रस्त्याच्या कडेला लावलेली रिक्षा, तसेच तीन दुचाकींची तोडफोड केली.
कुचेकर यांनी आरोपींना जाब विचारला. तेव्हा आरोपींनी त्यांना तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.
वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ
सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक भागात टोळक्याने रविवारी रात्री दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. टोळक्याने वैमनस्यातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आठवड्यापूर्वी बिबवेवाडीतील पद्मावतीनगर भागात टोळक्याने वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर तळजाई वसाहत भागात वाहन तोडफोड करण्याची घटना घडल्याने नागरिक दहशतीखाली आहेत.