आमचे छान जुळलेले मैत्र!
‘चिमणराव’ ही दूरदर्शनवरील पहिली मालिका आणि त्यामध्ये बाळ कर्वे हा गुंड्याभाऊ म्हणजे माझ्या मावसभावाची भूमिका करायचा. त्याचे व्यक्तिमत्त्व, आवाज आणि बोलणे हे सारेच भारून टाकणारे होते. सहकलाकाराच्या अभिनय पद्धतीचा अंदाज आल्यानंतर बरोबरचा कलाकारही खुलतो, ते आमच्या दोघांच्याही संदर्भात झाले. पहिलीच मालिका आणि लोकप्रिय झाल्यानंतर त्या लोकप्रियतेचा अनुभव आम्हाला दचकवणारा आणि भांबावणारा होता. एका अर्थाने आम्ही दोघेही पहिले टीव्हीस्टार होतो.
चिमणराव-गुंड्याभाऊ म्हणून अनेक ठिकाणी आमच्या एकत्रित मुलाखती झाल्या होत्या. या मालिकेतील माझी आई (सुलभा कोरान्ने), काऊ (स्मिता पावसकर-जी पुण्यात आहे), मैना (अरुणा पुरोहित- जी आता अफ्रिकेमध्ये असते), मोरू (नीरज माईणकर-जो अमेरिकेत आहे) आणि शेंडेफळ राघू (गणेश मतकरी) यांच्यासह गुंड्याभाऊ असे आमचे कुटुंब एकमेकांच्या कायम संपर्कात असते.
बाळला खाण्याची आणि खाऊ घालण्याची आवड होती. नाटकाच्या दौऱ्यावर गेल्यानंतर कोणत्या शहरात काय चांगले खायला मिळते, हे त्याला ठाऊक असायचे. तोच आम्हा कलाकारांना खाण्यासाठी घेऊन जात असे. ‘चिमणराव’मुळे आम्ही लोकप्रिय झालो हे खरे असले, तरी आमची पहिली भेट किंवा ओळख ही १९६८ मध्ये विजय तेंडुलकर यांच्या ‘लोभ नसावा ही विनंती’ या रंगायन संस्थेच्या नाटकातून झाली. विजया मेहता परदेशी गेल्यामुळे अरविंद देशपांडे यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले होते. दोस्त राष्ट्रांच्या फौजेवर आधारित या नाटकामध्ये मी न्यूझीलंडचा, तर बाळ हा ऑस्ट्रेलियाचा लष्करी अधिकारी होता.
‘धी गोवा हिंदू असोसिएशन’ निर्मित ‘सूर्याची पिल्ले’ नाटकाच्या मूळ संचामध्ये बाळ हा माझा सख्खा भाऊ होता. दामू केंकरे यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकाच्या तालमीला वसंत कानेटकर आवर्जून उपस्थित असायये. नाटकामध्ये सर्वांत मोठा भाऊ माधव वाटवे होता. त्यानंतर बाळ, मी आणि आमच्यातील लहान भाऊ मोहन गोखले होता. आमचे मैत्र इतके छान जुळले होते, की बाळ हा माझा सख्खा भाऊ आहे, अशीच माझीही भावना होती.
बाळने २५ ऑगस्टला ८६ व्या वर्षांत पदार्पण केले. तो आजारी असल्याची कल्पना असल्याने व्हाॅट्सॲपवर शुभेच्छा संदेश दिला होता. त्याच्या मुलीलाही दूरध्वनीवरून कळविले होते. त्या वेळी तिने १४ ऑगस्टपासून बाळ रुग्णालयात असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याच्या निधनाची बातमी ऐकायची मानसिक तयारी झाली होती.