पुणे : राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुनील भिरुड यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. भिरुड यांची नियुक्ती पुढील पाच वर्षांसाठी किंवा त्यांनी वयाची ६५ वर्षे पूर्ण करणे यातील जे आधी होईल त्या कालावधीसाठी आहे.सीओईपी ही राज्यातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी शिक्षण संस्था आहे. मूळचे अभियांत्रिकी महाविद्यालय असलेल्या सीओईपीला अलीकडेच विद्यापीठाचा दर्जा राज्य शासनाने दिला. त्यावेळी कुलगुरूपदी डॉ. मुकुल सुतावणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. डॉ. सुतावणे यांच्या राजीनाम्यानंतर डॉ. सुधीर आगाशे यांच्याकडे कुलगुरूपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
मात्र, काही दिवसांपूर्वी कुलगुरू पदासाठी नुकतीच प्रक्रिया राबवण्यात आली. त्यात राज्यपालांकडून डॉ. सुनील भिरुड यांची निवड झाली. डॉ. भिरुड मुंबईच्या वीरमाता जिजाबाई तंत्रशास्त्र संस्थेत प्राध्यापक आहेत.मोठा शैक्षणिक वारसा असलेल्या सीओईपीच्या कुलगुरूपदी निवड झाल्याचा आनंद व्यक्त करून डॉ. भिरुड म्हणाले, की गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योजकता, संशोधनाला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. महाविद्यालयाचे विद्यापीठात रुपांतर करण्यात आले असल्याने आता विद्यापीठ म्हणून अपेक्षित उद्दिष्ट्ये साध्य करण्यावर भर आहे. त्या दृष्टीने सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणार आहे.